Satara | राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. लोकांची सहानुभूती शरद पवार यांना आहे. परिवर्तनाची लाट पूर्ण राज्यात आहे. राज्यात सध्याच्या सरकारला लोक वैतागले आहेत.
सध्याचे सरकार फक्त राजकारण करत आहे. संविधान बदलण्याचे षडयंत्र या राजकारण्यांचे आहे, असे मत आ. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
आ. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जयरामस्वामी वडगाव येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जितेंद्र पवार, मानसिंगराव माळवे, सुरेश पाटील, विलास शिंदे,सतीश शिंदे, कृष्णत पिसाळ, संतोष घार्गे, संभाजी थोरात, शिवाजी सर्वगोड, अनिल माने, सुहास पिसाळ, दत्तात्रय मदने, सुशिला पिसे, राजेंद्र घार्गे, अविनाश घार्गे, रेखाताई घार्गे यांची उपस्थिती होती.
आ.पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपण आपल्या भागात कमी पडलो.परंतु, राज्याचा विचार केला तर महाविकास आघाडीचे काम चांगले आहे.लोकसभेला बहुमत मिळावे यासाठी ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होते.
अशा सर्वांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. स्वातंत्र्यवीरांच्या भूमीमध्ये जातीयवादी विचारांना थारा न देता आपण काम केले आहे. राज्याचा सहकार मंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मतदारसंघाबरोबर राज्यात विकास कामे केली आहेत.
राज्याच्या राजकारणात एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरू आहे.राजकारणाचा दर्जा खालावत चालला आहे. राजकारणासाठी शिवाजी महाराजांचा वापर करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.
आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. बदलापूरसारख्या घटनेत मुळापर्यंत जाण्यासाठी जो दुवा लागतो तो दुवा संपवण्याचा प्रकार घडला आहे..
राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांसाठी लागणारा पैसा आपलाच आहे. त्यामुळे भविष्यात आपले सरकार आल्यावर आपण या योजना बंद करणार नाही योजना चालूच राहतील. आपणाला दैनंदिन जीवनात वापराव्या लागणाऱ्या सर्वच वस्तूवर जीएसटी द्यावी लागते.
कर रूपाने शासनाकडे आपलाच पैसा जातो. या जिल्ह्यात दोन आमदार असे आहेत की ते म्हणतात सरकार आमचे आहे. आमच्या मनाला येईल तसे आम्ही करणार. या कार्यक्रमास पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार संतोष घार्गे यांनी मानले.
सहकाराच्या पाठीशी उभे राहावे
आपण सर्व भागाला समान न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ऊसाचे आंदोलन करणाऱ्यांनी सहकाराच्या पाठीशी राहावे. सहकारांमध्ये संस्था अडचणीत गेल्या तर भविष्यात खाजगी कारखानदारीच्या फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. अलीकडच्या काळामध्ये खाजगी कारखानदारी आली आहे. सहकारात ताकत आहे.
सहकारात सर्वांना समान न्याय दिला जातो. सहकारामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाते. एका खाजगी कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे सहा महिने वापरून लाखो रुपयांचे व्याज मिळवले. सहकारामध्ये असे होत नाही. म्हणून सहकारी कारखान्याच्या पाठीशी आपण राहिले पाहिजे.





