Satara | विधवांना सन्मानाची वागणूक देण्याचा क्रांतीकारी

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – कोणत्याही क्षेत्रात चांगले काम करताना चांगले काम करणाऱ्याला त्रास होत असतो. त्या त्रासाकडे दुर्लक्ष करून आपले चांगले काम करत राहिल्यास उशिरा का होईना त्या कामाचे चांगले फळ मिळते.
विधवांना सन्मानाची वागणूक देण्याचा रहाटणीकरांनी घेतलेला निर्णय समाजात क्रांती घडवणारा ठरावा, असे मत सामाजिक कार्यकर्ते सुहास पिसाळ यांनी व्यक्त केले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्गत रहाटणी (ता.खटाव) येथे राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
विधवा महिलांना हळदी-कुंकू लावून रोप भेट देण्यात आले. कार्यक्रमास रहाटणीचे सरपंच अनिल बुवा, उपसरपंच हणमंत थोरात, ग्रामसेवक उज्वला शिंदे, सुपरवायझर लीना साळुंखे, मुसांडवाडी सरपंच दाऊद पटेल, शिक्षिका सुवर्णा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
लीना साळुंखे म्हणाल्या, मैदानी खेळामुळे मुलांच्या स्नायूंचा विकास होतो पोषक व सकस आहाराने वजन वंचित वाढवते.सदृढ मुल जन्माला घालायचे असेल तर गरोदर मातांचा आहार योग्य असावा. लहानपणापासूनच आहाराकडे लक्ष द्यावे. वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छतेकडे सर्वांनी लक्ष द्यावे.
या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जनजागृतीसाठी नवीन जोडपं, गृहभेट, गरोदर माता,मदर केअर, अन्नप्राशन, लसीकरण, बाळ कोपरा, ‘पोषण भी,पढाईभी’ अँनिमिया, ग्रोथ चार्ट,’एक पेड मा के नाम’, ऊर्जावर्धक पदार्थ, कर्बोदके, बोधचिन्ह, सेल्फी पॉईंट असे वेगवेगळे उपक्रम राबवले. नीलम थोरात, सुवर्णा निकम, भारती बुवा यांनी सूत्रसंचालन केले. इन्ताज मुल्ला यांनी आभार मानले.
हळदी-कुंकू लावून विधवा महिलांचा सन्मान
विधवा महिलांना हळदी-कुंकू लावून इतर महिलांप्रमाणे सर्व कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा निर्धार या कार्यक्रमात करण्यात आला. महिलाही महिलाच असते.विधवा होण्यापूर्वी तिच्या हातून शुभ कार्य केले जाते.
तेव्हा ती शुभ असते. मग विधवा झाल्यानंतर तिच्या हातून शुभकार्य का चालत नाही. विधवा होणं हे काय तिच्या हातात असते का? असे सवाल उपस्थित करून यापुढे सर्वच कार्यात रहाटणीतील विधवा महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचा निर्णय घेण्यात आला.





