वांगचुक यांच्यावरून राजकारण तापले; भाजप आणि विरोधकांमध्ये जुंपली

नवी दिल्ली : वांगचुक आणि सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्यावरून राजकारण तापले. त्या घडामोडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचे पहावयास मिळाले. कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. सत्तेचा अहंकार असणाऱ्या सरकारने शांततामय मार्गाने दिल्लीकडे निघालेल्या लडाखमधील नागरिकांना ताब्यात घेतले.
ती कृती भ्याड स्वरूपाची आणि लोकशाहीविरोधी असल्याचे कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. आंदोलकांना ताब्यात घेण्याची कृती अस्वीकारार्ह असल्याचे टीकास्त्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोडले. याआधी शेतकऱ्यांबाबतही असेच घडले. पण, चक्रव्यूह भेदला जाईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहंकारही मोडेल. त्यांना लडाखचा आवाज ऐकावा लागेल, असे भाष्य राहुल यांनी केले.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी बवाना पोलीस ठाण्यात जाऊन वांगचुक यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना भेटीची परवानगी नाकारली. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दरम्यान, वांगचुक यांना ताब्यात घेण्यावरून होणारी टीका म्हणजे विरोधकांच्या ढोंगीपणाचा कळस असल्याचा पलटवार भाजपने केला. कॉंग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांत व्यंगचित्रकार आणि इतरांना अटक होते. त्यावेळी ते पक्ष मौन बाळगतात, असे प्रत्युत्तर भाजपने दिले.





