भुईंज-ओझर्डे गटात राजकीय घमासान! गटात कुणबी दाखल्यावर दिग्गजांची नजर, शशिकांत शिंदेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

प्रभात वृत्तसेवा
भुईंज – ओझर्डे -भुईंज जिल्हा परिषद गटामधील आरक्षण निश्चित झाल्यानंतर इच्छुकांकडून आपल्या गोटात कोणाला घ्यायचे याची जुळवाजुळव सुरू केली आहे. आरक्षणामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची असा चंग इच्छुक उमेदवारांनी बांधला आहे. परंपरागत विरोधक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ना. मकरंद पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप नेते माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या उमेदवारामध्ये ‘हाय व्होल्टेज’ लढत होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भुईंज व ओझर्डे गटातून महाविकास आघाडीचे लोकसभेचे पराभूत उमेदवार शशिकांत शिंदे यांना भुईंज व ओझर्डे गटांमधून वाढते मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे येऊ घातलेल्या ओझर्डे- भुईंज जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (शरद पवार गट) हे भाजपला पाठिंबा देणार? की राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवार उभा करणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ओझर्डे जिल्हा परिषद गट ना. मकरंद पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पाठीमागील निवडणुकीत ओझर्डे भुईंज जिल्हा परिषद गटात ना. मकरंद पाटील यांचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. यावेळी महाविकास आघाडीचे नेते शशिकांत शिंदे (शरद पवार गट) यांनी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपाला दोन्ही गटात मदत केल्यास ना.मकरंद पाटील गटासाठी ही निवडणूक डोकेदुखीची ठरणार आहे.
दिग्गज नेत्यांकडे कुणबी दाखले..
भुईंज जिल्हा परिषद गट हा ओबीसी पुरुष आरक्षित असल्याने या ठिकाणी कुणबी दाखल्याचा आधार घेत अनेकांनी निवडणूक लढवण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे. कुणबी दाखला काढण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. कधी ना कधी कुणबी दाखल्याची आवश्यकता भासेल ही गरज लक्षात घेऊन गट व गणातील दिग्गज नेत्यांनी कुणबी दाखले काढले आहेत. त्यामुळे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणबी दाखल्यावर खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दिलीप बाबर निवडणूक लढवणार का?
माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर यांनी माजी खासदार स्व. लक्षमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील भुईंज जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, राष्ट्रवादीची दुफळी झाल्यानंतर दिलीप बाबर यांनी महाविकास आघाडीकडे जाऊन शरद पवार गटाचे नेतृत्व करत असताना दिसत आहेत. त्यामुळे भुईंज जिल्हा परिषद गटातून कुणबी दाखल्याचा आधार घेत ते निवडणुकीत उतरणार का? हे येऊ घातलेल्या काळात समजणार आहे.





