आरक्षणाआधीच राजकीय भूकंप! खालापूरात सत्तासंघर्ष शिगेला ; कोण कुणाच्या बाजूने?

प्रभात वृत्तसेवा
खालापूर – तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा तापली आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस वेग दिला आहे. नवनियुक्त्या, जनसंपर्क मोहिमा आणि सभा-मेळावे यामुळे तालुक्यात राजकीय हालचालींना उधाण आले आहे. इच्छुक उमेदवार मात्र आरक्षण जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत चारपैकी तीन जागा राष्ट्रवादीकडे व एक शिवसेनेकडे होत्या, तर पंचायत समितीत चार राष्ट्रवादी, तीन शिवसेना आणि एक शेकापकडे संख्याबळ होते. मात्र गेल्या काही वर्षांत मोठे राजकीय उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादीचे दोन सदस्य भाजपात गेले तर माजी उपसभापतींनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
कर्जत-खालापूर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन गट पडले असले तरी दोन्ही आघाड्यांमध्ये अंतर्गत बिघाड दिसत आहे. विशेषत: शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे महाविकास आघाडीत असूनही तालुक्यात आमनेसामने उभे राहणार आहेत. दोन्ही गटांनी गावोगाव सभा व बैठका घेऊन आपापल्या कार्यकर्त्यांना सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत.
भाजप, शेकाप, आरपीआय आणि आय काँग्रेस हे पक्ष सध्या तटस्थ भूमिकेत आहेत. मात्र शेवटच्या टप्प्यावर हे मित्रपक्ष कोणाच्या पाठीशी उभे राहतात, हेच खऱ्या अर्थाने निकाल ठरविणारे ठरणार आहे. गावोगाव भाजप कार्यकर्त्यांमध्येही फूट पडलेली दिसत असून, काही कार्यकर्ते शिंदे गटाला तर काही राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे चित्र आहे.
शिंदे गटाचा विस्तार, राष्ट्रवादीची तयारी..
विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आमदार झाले असले तरी त्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी अपक्ष उमेदवार उभा करून विजय मिळविला होता. त्यानंतर शिंदे गटाने तालुक्यात संघटन बळकटीसाठी मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी केली आहे. राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तरादाखल ग्रामस्तरावर जनसंपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत. यामुळे खालापूर तालुक्यातील निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या होण्याची शक्यता आहे.
विद्यमान संख्याबळ..
खालापुरात जिल्हा परिषदेच्या एकूण चार आहेत. त्यातील राष्ट्रवादीकडे तीन आणि शिवसेनेकडे एक जागा आहे. तसेच पंचायत समितीच्या एकूण आठ जागा आहेत. त्यातील राष्ट्रवादीकडे चार, शिवसेनेकडे तीन आणि शेकापकडे एक जागा आहे. ताज्या राजकीय हालचालींनंतर राष्ट्रवादीचे दोन सदस्य भाजपात गेले असून माजी उपसभापती शिंदे गटात गेले आहेत.
विद्यमान सदस्य आणि मतदारसंघ..
तालुक्यात एकूण चार मतदार संघ आहेत. साजगाव मतदार संघात नरेश पाटील, वडगाव जिल्हा परिषद मतदार संघात पदमा पाटील तर वांसाबे मतदार संघात उमा मुंढे, तसेच चौक मतदार संघातून मोतीराम ठोंबरे यांना संधी मिळाली होती. सोबतच पंचायत समितीच्या साजगाव मतदार संघात श्रद्धा साखरे, खरीवली मतदार संघात उत्तम परबलकर, वडगाव मतदार संघात शेकापचे कातकरी तर कुंभिवली मतदार संघात विश्वनाथ पाटील, चौक मतदार संघात कमळ भस्मा आणि अक्षय पिंगळे तर वांसाबे मतदार संघात कांचन पारंगे आणि वृषाली पाटील यांना पंचायत समिती सदस्य म्हणून संधी मिळाली होती.




