Indapur News : इंदापूरचे राजकारण तापले! हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्या संघर्षात कोण मारणार बाजी? जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
इंदापूर – इंदापूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी वेग घेत असून, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यामध्येच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, इंदापूर नगरपालिका या पंचवार्षिक निवडणुकीत खर्या अर्थाने, दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच, मोठी लढत होणार आहे.या संदर्भात अधिक माहिती अशी की, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची कृषिमंत्री म्हणून वर्णी लागल्या नंतर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वजन राज्य पातळीवर वाढलेले आहे.
शेतकर्यांना संकटाच्या काळात राज्यभर कृषी मंत्री म्हणून दत्तात्रेय भरणे यांनी दिलेला आधार व कृषी विभागाच्या माध्यमातून केलेली मदत यामुळे राज्यात नेहमी वादात असलेले कृषिमंत्री पद दत्तात्रय भरणे यांनी नैसर्गिक आसमानी संकटात देखील कृषी मंत्रीपदाची गणीमा राखलेली आहे. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये भरणे यांना स्थान मिळाल्याने, इंदापूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या परिपक्व करण्यासाठी, पक्ष संघटना, कार्यकर्ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या लागलेल्या निवडणुकीच्या तयारीसाठी उतरवले आहेत.
तर इंदापूर विधानसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना अपयश येऊन देखील, त्यांनी नीरा-भीमा साखर कारखान्या सारख्या मोठ्या संस्था बिनविरोध करून, आपली राजकीय ताकद विरोधकांना दाखवली आहे. त्यातच राज्यात साखर कारखानदारी अडचणीत असल्यामुळे, त्याचा फटका देखील इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्यांना बसला आहे. तरीदेखील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या विचाराचे दोन सहकारी साखर कारखाने, यंदाच्या गाळपासाठी सज्ज केले आहेत.
दिवाळी अगोदर शेतकर्यांना प्रति टनाला शंभर रुपये देण्याची भूमिका घेतल्याने, ऊस उत्पादक सभासद सध्या तरी हर्षवर्धन पाटील यांच्या कारभारावर खूश आहेत. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी, उसाला दर, आरक्षण या विविध विषयावर प्रहार करत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेत, आपले राजकीय वातावरण निर्माण करतील. असे असले तरी, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी लढवलेली विधानसभा, त्यांनी मिळवलेले मतदान व ते सध्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून, वेगाने सुरू केलेले कामकाज यामुळे भाजपची मोठी ताकद निर्माण झाली आहे.
सध्या इंदापूर तालुक्यामध्ये स्वतःच्या हिमतीवर भाजप विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील कोणत्या दिगजला धक्का द्यायचा, कोणाला पाडायचे, कोणाला विजयी करायचे, हे मात्र गणित यंदा इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी परफेक्ट करू शकणार आहे.
इंदापूर नगर परिषदेची उत्सुकता..
इंदापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वसाधारण नगराध्यक्ष पद जाहीर झाले आहे. ज्या शहा परिवाराने देशपातळीवर माजी नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा यांच्या कार्यकाळात इंदापूर शहराचा नावलौकिक केला. नगरपालिकेला गौरव मिळवून देण्याचे काम केले. त्या परिवारातील कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन भरत शहा यांचे नगराध्यक्ष पदासाठी शहरवासीयांनी नाव पुढे आणले आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्ष संघटनेची इंदापूर शहरात मागील दोन दिवसांत विशेष बैठक घेऊन, निवडणुकीच्या कामासाठी कार्यकर्ते उतरवले आहेत. शहा परिवाराला सपोर्ट करण्यासाठी दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील दिसत आहेत. मात्र शहा परिवार काय भूमिका घेणार? की स्वतंत्र लढणार, याची उत्सुकता मात्र शिगेला पोचलेली दिसते.





