हैदराबाद: बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्या नेतृत्वाखालील ‘महागठबंधन’चा भाग न होता एकट्याने लढणाऱ्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसला पाठिंबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी घोषणा केली आहे की, त्यांची पार्टी तेलंगणा राज्यातील जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांना पाठिंबा देईल. ओवैसींच्या निर्णयामागचं कारण काय? बिहारमध्ये ‘महागठबंधन’वर जोरदार टीका करणारे ओवैसी तेलंगणात काँग्रेसला पाठिंबा का देत आहेत, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जुबली हिल्स पोटनिवडणुकीच्या निकालामुळे राज्यातील सध्याच्या सरकारला कोणताही फायदा किंवा तोटा होणार नाही. हा निर्णय पूर्णपणे मतदारसंघाच्या विकासावर आधारित आहे. ओवैसी यांनी जुबली हिल्सच्या मतदारांना आवाहन केले आहे की, “या निवडणुकीच्या निकालामुळे सरकार बदलणार नाही. आम्ही गेल्या दहा वर्षांपासून भारत राष्ट्र समिती (BRS) ला पाठिंबा देणाऱ्या जवळपास चार लाख मतदारांना आवाहन करतो की, त्यांनी आता तरुण नेते नवीन यादव यांना मतदान करावे, जे जुबली हिल्समध्ये विकास घडवून आणू शकतात.” ओवैसींनी भारत राष्ट्र समिती (BRS) वरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, BRS ने गेल्या दहा वर्षांत या भागाचे प्रतिनिधित्व करूनही कोणताही विकास साधला नाही. जुबली हिल्स विधानसभा जागेसाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि निकाल बिहार विधानसभा निवडणुकीसोबतच १४ नोव्हेंबरला जाहीर होईल. या वर्षी जूनमध्ये BRS चे आमदार मगंती गोपीनाथ यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती, ज्यामुळे येथे पोटनिवडणूक घेणे आवश्यक झाले आहे.