Nitin Gadkari : ‘माझ्या विरोधात राजकीय मोहीम’; नितीन गडकरींची इथेनॉल मिश्रित इंधन वापरावर मोठं विधान

नवी दिल्ली : सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन वापराच्या धोरणासंदर्भात सोशल मीडियावर अलिकडे काही दिवसांपासून टीका होत आहे. ही टीका माझ्याविरोधात पेड पॉलिटिकल कॅम्पेन सुरू आहे. तसेच ती कोणत्याही तथ्यांवर आधारित नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ई-२० इंधन अंमलबजावणी कार्यक्रमाला आव्हान देणारी याचिका फेटाळली होती.
ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीच्या ६५ व्या वार्षिक अधिवेशनात नितीन गडकरी यांना ई-२० वापराबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. याचे उत्तर देत असताना त्यांनी त्यांच्याविरोधात पैसे देऊन मोहीम चालवली जात असल्याचा आरोप केला.
नितीन गडकरी म्हणाले, ऑटोमोबाईल उत्पादक आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) सारख्या संस्थांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्यासंदर्भात त्यांची निरीक्षणे नोंदविली आहेत. तुमचे (ऑटोमोबाइल) क्षेत्र ज्या प्रकारे काम करते, त्याप्रकारेच आमचे (राजकीय) क्षेत्रही काम करते.
मला राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी Political campaign. इथेनॉलच्या वापराबाबत कोणतीही शंका-कुशंका नाही. इथेनॉलचा वापर किफायतशीर आणि प्रदूषणमूक्त आहे.
आपण २२ लाख कोटी रुपये इंधन आयात करण्यासाठी खर्च करतो. पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे की, आपला भारत स्वावलंबी झाला पाहिजे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून जर हेच २२ लाख कोटी रुपये वाचणार असतील तर हे आपण करायला नको का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच नवे वाहन खरेदी करताना जुने वाहन विकायला काढल्यास त्यावरील जीएसटी माफ करण्यात यावा, अशी विनंती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. असा निर्णय झाल्यास ग्राहक आणि संबंधित क्षेत्राला याचा मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले.





