Delhi Assembly Elections 2025 – आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर दंड थोपटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज 11 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणुकीची घोषणा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच होण्याची शक्यता आहे. बदली येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुलायम सिंह यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांची लढत काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांच्याशी होणार आहेत. तर बुराडीतून रतन त्यागी, चांदनी चौकमधून खालिद उर रहमान, बल्ली मारनमधून मोहम्मद हारुन आणि ओखलामधून इम्रान सैफी यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय छतरपूरमधून नरेंद्र तंवर, लक्ष्मी नगरमधून नमहा, गोकुळपुरीतून जगदीश भगत, मंगोलपुरीतून खेम चंद, सीमापुरीतून राजेश लोहिया आणि संगम विहारमधून कमर अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरमयान, दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आम आदमी पक्ष आघाडीवर आहे. त्यांनी सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसनेही दोन याद्या जाहीर केल्या असून 70 पैकी 47 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, भाजपने सावध पावले टाकत अद्याप आपले उमेदवार गुलदस्त्यात ठेवले आहेत.