Prashant Kishor : निकालापूर्वी राजकीय वातावरण तापले; प्रशांत किशोर यांचा बिहार सरकारवर थेट हल्ला
बिहारमधील हाय-प्रोफाइल समजल्या जाणाऱ्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत.

Prashant Kishor – बिहारमधील हाय-प्रोफाइल समजल्या जाणाऱ्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. मात्र, निकालाच्या आदल्या दिवशीच या मतदारसंघातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.
जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी सत्ताधारी भाजप आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्या जन सुराजचा विजय होईल आणि त्यासोबतच सम्राट चौधरी यांच्या जाण्याचा मार्ग मोकळा होईल, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.
तसेच, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत निवडणूक जिंकण्यासाठी प्रशासनाचा कधीही गैरवापर केला नव्हता, असे सांगत प्रशांत किशोर यांनी सध्याच्या प्रशासकीय भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
प्रशांत किशोर यांनी थेट पाटना एसएसपी यांच्यावर भाजपच्या सांगण्यावरून काम केल्याचा आरोप केला आहे. मतदानाच्या दिवशी आणि त्यापूर्वी जन सुराजच्या स्थानिक नेत्यांना व पोलिंग एजंट्सना पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचे त्यांनी म्हटले.
मतदानाच्या दिवशी गोलघर परिसरात जन सुराजचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या वेळी प्रशांत किशोर यांची नगर पोलिस अधीक्षक (मध्य) ममता कल्याणी यांच्यासोबत जोरदार वादावादी झाली.
मंगळवार संध्याकाळपासून जन सुराजच्या २० हून अधिक नेत्यांना व कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्रास दिला. त्यांना कोणत्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे, याची कोणतीही नोंद दप्तरी करण्यात आली नव्हती, असा दावा त्यांनी केला.
ताब्यात घेतलेल्या नेत्यांना आधी वेगवेगळ्या ठाण्यांत ठेवण्यात आले, नंतर दानापूर आणि मीडियाला माहिती मिळताच शाहपूर ठाण्यात हलवण्यात आले. जर कोणी कायदा मोडला असेल, तर त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करा.
परंतु, कोणत्याही स्पष्ट आरोपाशिवाय नेत्यांना रात्रीच्या वेळी त्यांच्या घरातून उचलणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे. पोलिस राजकीय पक्षासारखे काम करत आहेत,असा संतप्त सवाल प्रशांत किशोर यांनी केला.






