राज ठाकरे-फडणवीस भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग; मनसेचा बडा नेता उदय सामंतांच्या भेटीला

मुंबई : मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुरुवारी सकाळी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण घडण्याची चिन्हं दिसत आहेत. या गुप्त बैठकीनंतर काही तासांतच मनसेचे महत्त्वाचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी थेट शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मनसे आणि महायुतीमध्ये पुन्हा संवाद सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात तब्ब्ल तासभर चर्चा झाली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देशपांडे आणि खोपकर यांनी उदय सामंत यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी जाऊन चर्चा केल्यामुळे महायुतीसोबत युतीबाबत मनसे पुन्हा विचार करत असल्याचे बोलले जात आहे.
मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती आणि मनसेमध्ये जवळीक निर्माण झाली होती. परंतु माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाने उमेदवार दिल्यानंतर मनसेने स्वतंत्र लढतीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महायुती सरकार स्थापन झाल्यावरही मनसेला सत्ता-सहभाग मिळाला नाही, यामुळे दुरावा निर्माण झाला होता.
अलीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा रंगली होती. दोघांची युती मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसारख्या महानगरपालिकांमध्ये निर्णायक ठरू शकते. पण आता राज ठाकरे यांनी फडणवीस आणि शिंदे गटाशी पुन्हा संवाद सुरू केल्यामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
या भेटीनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे महायुतीसोबत हातमिळवणी करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





