PSI Ranjit Kasale : निलंबित होताच पोलीस तळीरामाचा मोठा गौप्यस्फोट; धनंजय मुंडे, वाल्मिक कराडच्या पैशाच्या गाड्या पकडल्यामुळेच….

बीड : बीड पोलीस दलातील एका पीएसआयचे निलंबन करण्यात आले आहे. रणजित कासले असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बुधवारी पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांना निलंबित केल्याचे आदेश जारी केले. यानंतर संतापलेल्या उपनिरीक्षकाने वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडियावरती व्हायरल केले आहेत. कासले यांनी मद्यपान करून अपर पोलीस महासंचालकांसह गुजरातमधील एका बिल्डरवर अनेक गंभीर आरोप करत या सगळ्यांची चौकशी करावी अशी मागणी केली. कासले यांनी आपल्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, पोलीस अधिकारी यांची नावे घेतली आहेत. ( Suspended PSI Ranjit Kasale)
नेमकं प्रकरण काय?
पाच महिन्यांपूर्वी नियंत्रण कक्षातून सायबर विभागात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांची बदली करण्यात आली होती. त्यांच्याकडे सायबर गुन्ह्यातील प्रकरणाचा परराज्यातील तपास सोपवण्यात आला होता. ते सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी बाहेर राज्यात गेले होते. या प्रकरणात त्यांनी आर्थिक तडजोड केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. हे प्रकरण राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. चौकशीअंती उपनिरीक्षक रणजित कासले दोषी आढळून आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. या कारवाईनंतर संतापलेल्या कासले यांनी सोशल माध्यमावर व्हिडीओ व्हायरल केले आहेत. (Ranjit Kasale)
या व्हिडीओमध्ये कासले यांनी आरोप केला की, अपर पोलीस महासंचालक आणि त्यांचा एक पार्टनर यांनी मला टार्गेट केले आहे. एका महिलेच्या सांगण्यावरून मला निलंबित करण्यात आलेले आहे. माझ्यावर होणारा अन्याय मी जनतेच्या समोर मांडत असून मला न्याय मिळावा, असे त्यांनी व्हिडीओत म्हटले आहे. मला निलंबित करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याला कोणी कॉल केले, त्या सगळ्यांचे कॉल तपासा. या लोकांनी माझ्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये, माझ्याकडे बरेच पुरावे आहेत. ते जनतेसाठी मी वेळप्रसंगी सादर करणार आहे, असेदेखील रणजित कोसले यांनी सांगितले.
दारू पिल्यानंतर माणूस खरं बोलतो
पीएसआय कासले यांनी सोशल माध्यमावर प्रसारित केलेल्या व्हिडीओत मद्यपान केल्याची कबुली दिली. ते म्हणाले, दारू पिल्यानंतर माणूस खरं बोलतो. मी देखील दारू प्यायलो आहे. आणि खरंच बोलत आहे. एका महिलेला खूश ठेवण्यासाठी माझ्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे. आयपीएस अधिकाऱ्याचा पार्टनर असलेला बिल्डर आणि त्यांची पत्नी यांनी मला टार्गेट केले आहे. त्यांच्या अनेक भानगडी आता मी सोशल मीडियातून बाहेर काढणार आहे, असा इशाराही या उपनिरीक्षकाने दिला आहे.
मुंडे, कराडच्या पैशाच्या गाड्या पकडल्यामुळे परळीत बंदोबस्त लावला
ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडे, वाल्मिक कराडच्या पैसे आणणाऱ्या अनेक गाड्या पकडल्यामुळे, त्यांनी परळीत बंदोबस्त लावला होता. मी गाड्या चेक करत होतो, म्हणून मला त्या दिवशी काम नाही सांगितले, परंतु, पेट्या येण्याच्या दिवशीच मुंडेंनी माझ्याकडून बंदोबस्त मागे घेतला आणि मला आरक्षित ठेवले. त्याच दिवशी, संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन खात्यातून माझ्या खात्यात 10 लाख रुपये जमा झाले. ते का झाले? याबाबत प्रश्न उपस्थित करत, रणजित कासलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रींना तपास करण्याचे आवाहन केले आहे. (Parli Assembly Elections)





