शिरूरमध्ये पोलिसांची दमदार कारवाई; कोयत्याने दहशत माजवणाऱ्या तिघांना अटक

शिरूर – तालुक्यातील विशाल कृषी सेवा केंद्रात घुसून कोयत्याच्या धाकाने मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना शिरूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केलं. या जलद आणि प्रभावी कारवाईने पोलिसांनी स्थानिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला आहे.
५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता दुकानमालक शिवम शिंदे यांच्यावर परवेज उर्फ पाप्या पठाण (वय १९), रूपेश चित्ते (वय २२) आणि ओंकार जाधव (वय २६, सर्व रा. तर्डोबाची वाडी) यांनी हल्ला केला. आरोपींनी दुकानात गोंधळ घालत शिवीगाळ केली, कात्रीने शिंदे यांच्या हातापायावर, तर कोयत्याने डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केलं. कोयत्याच्या धाकाने परिसरात दहशत पसरली, अनेक दुकानं बंद झाली आणि नागरिकांनी पळ काढला. संतोष पाचरणे यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष पथक स्थापन करत तात्काळ तपास सुरू केला. अल्पावधीत तिघांना अटक करून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला. केंजळे म्हणाले, “शहरात दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.”
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र साबळे, हवालदार जगताप, अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांच्या पथकाने केली.





