Malegaon – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव ३ वर्षीय चिमुरडीवरील बलात्कार व हत्येच्या प्रकरणामुळे हादरले असून या घटनेच्या निषेधार्थ येथील नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक देऊन मोर्चा काढला होता. पण मोर्चेक-यांनी थेट स्थानिक न्यायालयाच्या इमारतीत शिरण्याच्या प्रयत्न केल्याने पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका ३ वर्षीय मुलीवर गावातीलच विजय संजय खैरनार नामक आरोपीने पाशवी बलात्कार केला होता. त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्याही केली होती. या प्रकरणाचे सध्या राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी नागरिकांनी शुक्रवारी मालेगाव बंदची हाक दिली होती. त्याला व्यापारी संघटना, शाळा व महाविद्यालये, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रकरणी रामसेतू पुलावरून एक मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर अप्पर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आला. यावेळी मोर्चक-यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या मोर्चात मंत्री दादा भुसेही सहभागी झाले होते. यावेळी काही मोर्चेक-यांनी अचानक स्थानिक न्यायालयाच्या परिसरात शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ माजली. मोर्चेकरी थेट कोर्टाच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून मोर्चेक-यांना न्यायालय परिसरात प्रवेश न करता आपल्या मार्गाने जाण्याचे आवाहन केले. पण मोर्चेक-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. हे पाहून मोर्चेक-यांची एकच धावपळ उडाली. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर शेकडो मोर्चेकरी कोर्टाच्या परिसरात जमले होते. तिथे त्यांची आणखी समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेनंतर कोर्टाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.