Police Helpline: ‘डायल ११२’वर आलेल्या ‘त्या’ कॉल्समुळे पोलीस चक्रावून गेले; सत्य समोर आल्यावर कपाळावर हात
Police Helpline: आपत्कालीन मदतीसाठीच्या 'डायल ११२'चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर; बोरगाव पोलिसांची नाहक धावाधाव, खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचण्यात अडथळे.

Police Helpline – आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या डायल 112 या एकात्मिक आपत्कालीन सेवा क्रमांकाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. विनाकारण फोन करणे, खोट्या तक्रारी देणे, मद्यधुंद अवस्थेत कॉल करणे किंवा केवळ गंमत म्हणून संपर्क साधणे अशा प्रकारांमुळे पोलीस यंत्रणेवर अनावश्यक ताण निर्माण होत असून, खर्या गरजूंपर्यंत मदत पोहोचण्यात विलंब होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोज येणार्या कॉलपैकी लक्षणीय संख्या ही विनाकारण अथवा खोट्या माहितीची असते हे बर्याच वेळी उघड होते. बोरगाव पोलीस ठाण्याचे अर्धअधिक कार्यक्षेत्र पश्चिमेकडील डोंगराळ भागात आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील एमडीटी (112) कर्तव्यावर नेमलेले कर्मचारी कॉल पडताच मदतीसाठी धाव घेतात. मात्र जाग्यावर पोहोचल्यावर सत्यता पाहता ती धावाधाव निरर्थक ठरते.
अपघात, मारहाण, महिलांवरील अत्याचार किंवा अन्य गंभीर घटनांमध्ये मदत पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता वाढते. डायल 112 ही सेवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आली असून, एका फोनवर पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणेशी समन्वय साधला जातो. मात्र काही वापरकर्त्यांकडून या सेवेचा सातत्याने गैरवापर होत असल्याने योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना विनाकारण किंवा खोटे कॉल न करण्याचे वारंवार आवाहन केले आहे. खोटी माहिती देणार्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, व तसे गुन्हे जिल्ह्यात दाखलही झाले आहेत व यापुढेही करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
“डायल 112 च्या वापराबाबत अनेक किस्से घडतात. त्यामध्ये मांजर विहिरीत पडले, ड्रेनेज पाईप फुटल्याने वास येतोय तर सायंकाळी सात ते अगदी रात्री अकरा वाजेपर्यंत नवरा दारू पिलाय, जेवु झोपू देत नाही अशा तक्रारी सांगितल्या जातात. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वेळेचा अपव्यय होतो. यंत्रणेतील नियमांप्रमाणे डायल 112 चे कॉल जागेवर जावूनच क्लोज करावे लागतात त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून डायल 112 चा वापर केवळ वास्तविक आपत्कालीन परिस्थितीतच करावा, असे आवाहन मी नागरिकांना करतो.”
– प्रशांत हुले, सहाय्यक पोलिस निरिक्षक, बोरगांव पोलिस ठाणे






