मुंबईतील बड्या उद्योगपतीला मारण्याचा कट पोलिसांनी उधळला; बिष्णोई गँगचे 5 जण अटकेत

मुंबई : मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अंधेरी परिसरातून बिश्नोई गँगच्या पाच सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीची पिस्तूलं, 21 जिवंत काडतुसं आणि दोन सिमकार्ड जप्त केले. हे संशयित आरोपी एक प्रमुख उद्योगपतीवर हल्ला करण्याचा कट रचत होते. गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती आणि हल्ल्याची योजना रमजान ईदच्या वेळी राबवण्याचा विचार केला होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
विकाष दिनेष ठाकुर उर्फ विकी (वय 24 वर्ष), सुमीतकुमार मुकेषकुमार दिलावर (वय 26 वर्ष), देवेंद्र रूपेष सक्सेना (वय 24 वर्ष), श्रेयस सुरेष यादव (वय 27), विवेककुमार नागेंद्र सहा गुप्ता (वय 22 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींशी सखोल चौकशी सुरू केली असून, या कटाच्या मागे असलेले नेत्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अधिक तपासामध्ये आणखी काही आरोपींची अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा कट पोलिसांनी वेळेवर उधळला असल्याने उच्चस्तरीय व्यक्तींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका मोठ्या गुंडाच्या सांगण्यावरून मुंबईत एक टोळी सक्रीय झाल्याचे सांगण्यात आले. ही टोळी कोणाची तरी हत्या करण्यासाठी मुंबईत आलेली आहे, असे समजताच वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी गेल्या दोन गोळीबाराच्या घटना लक्षात घेऊन मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली.
पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करून आरोपींचा शोध सुरू केला. ज्यानंतर 28 मार्च 2025 रोजी या टोळीतील एक सदस्य मुंबईतील अंधेरी येथील प्लॅटिनम हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी एक पथक तयार करत हॉटेलच्या रुम क्रमांक 16 वर छापा टाकून पाच आरोपींना अटक केली. आरोपींकडून 7 पिस्तुले, 21 राउंड गोळ्या, मोबाईल फोनचे डोंगल आणि सिमकार्ड सापडले. दरम्यान, हे लोक एका बड्या गुंडाच्या सांगण्यावरून मुंबईतील एका व्यक्तीचा खून करण्यासाठी आल्याचे पोलिसांना तपास करताना माहिती मिळाली.





