गरीब मुस्लिम बांधवांना पोलिसांकडून खजूर आणि फळांचे वाटप

पिंपरी (प्रतिनिधी) – रमजान महिन्यातील रोजा सोडण्यासाठी (इफ्तारी) मुस्लिम बांधवांना खजूर आणि फळांची आवश्यकता असते. यामुळे वाकड पोलिसांकडून गरीब मुस्लिम बांधवांना फळांचे वाटाप करीत अनोख्या पद्धतीने सौहार्दाचे दर्शन घडवलय.
एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे संपूर्ण पिंपरी शहरातील विविध भाग सील करण्यात आले आहेत. यामुळे अनेकांना बाहेर पडता येत नाही. यामुळे इफ्तारीसाठी हे खाद्य पदार्थ आणायचे कसे, हा प्रश्न अनेक मुस्लिम बांधवांना पडला होता. मात्र वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक निरीक्षक हरीश माने आणि इतर अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः जवळील पैसे जमवत हे साहित्य खरेदी केले. या पैशातून खजूर आणि फळे आणत गरजू मुस्लिम बांधवांना घरपोच नेऊन दिले. अचानक आलेल्या भेटीमुळे मुस्लिम कुटूंब भारावून गेली.
विशेष म्हणजे रमजान महिन्यातील सर्व नमाज मस्जिदमध्ये पठण करणं अनिवार्य असतांनाही केवळ करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांकडून घरात बसूनच नमाज पठण केल्या जात असल्याने मुगळीकर ह्यांनी त्यांचे आभार मानले. अशाच पद्धतीने शहरातील सर्वनागरिकांनी आणखी काही दिवस सहकार्य केल्यास करोना विरुद्धचा लढा आपण नक्की जिकुं असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी व्यक्त केला.





