पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- चालत्या पीएमपी बसला दुचाकी आडवी लावून “बस का दाबली’, अशी विचारणा करत दुचाकीवरील पोलीस कर्मचाऱ्याने बसचालकाला मारहाण केली. वाडिया काॅलेज परिसरात रविवारी (दि. २१) सकाळी ही घटना घडली. त्यामुळे प्रवासी खोळबंले. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले. न. ता. वाडी डेपोची बस मनपाकडे जात असताना, वाडिया काॅलेज येथे एका पोलिसाने बसला दुचाकी आडवी लावली. त्यानंतर बसमध्ये येत “बसने मला का दाबले’ अशी विचारणा करत बसचालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही प्रवाशांनी या मारहाणीचे व्हिडिओ केले. ते व्हायरल होताच, उलट-सुलट चर्चा सुरू झाली. या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी बसचालकाला मारहाण करत आहे, तर बसचालकाने त्याची काॅलर पकडून, मारतोय कशाला अशी विचारणा करताना दिसत आहे. हा वाद पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर बस तिकीट तपासणीसाने संबंधित चालकाला रीतसर गुन्हा दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनीच मध्यस्थी करत चालकाची माफी मागितली. त्यावर बसचालकाने समजुतीने हे प्रकरण मिटवले. तसेच पोलीस कर्मचाऱ्याच्या कृत्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला, बसची फेरी चुकली यामुळे संबंधित पोलिसाकडून तीन हजार दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले.