पुणे – मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या टोळक्यावर समोरील टोळक्याने कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील एक जखमीवर स्थानबध्दतेची कारवाई झाली होती. तर आरोपींमध्ये एका तडीपार केलेल्या गुंडाचा समावेश आहे. ही घटना आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईनगर येथील मोकळ्या मैदानावर मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी समर्थ राकेश साळुंखे (१८, रा. कात्रज) याने तक्रार दिली आहे. त्यानूसार सोन्या कांबळे, अमोल अडाम, अमोल मदनकर, गणेश दोडमणी, चिक्या व इतर दोघांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील जखमी आशिष प्रधान याच्यावर(२३) एमपीडीएची कारवाई झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी यांचा मित्र इशांत कोकाटे यास सोन्या कांबळे, अमोल अडाम, अमोल मदनकर, गणेश दोडमणी, चिक्या यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा जाब विचारण्याकरीता फिर्यादी साईनगर गल्ली नंबर तीन येथे मित्रांसोबत गेला होता. यावेळी सोन्या कांबळे याने त्यास तु आम्हाला जाब विचारणारा कोण ? असा सवाल केला. यानंतर त्याचे साथीदार अमोल अडाम, अमोल मदनकर, गणेश दोडमणी, चिक्या व इतर दोघांस इशारे करुन कोयते घेऊन येण्यास सांगितले. ते कोयते घेऊन आल्यावर फिर्यादीचा मित्र आशिष प्रधान याच्या मानेवर वार करण्यात आले. ते बघुन फिर्यादी व त्याचे मित्र तेथून पळून जाऊ लागले. यावेळी फिर्यादी पाय घसरुण खाली पडला. ही संधी साधत आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर, हातावर, पायावर कोयत्यांनी वार केले. ही घटना समजताच आंबेगाव पोलीसांचे मार्शल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना त्वरीत रुग्णालयात दाखल केले. दरम्यान आरोपींचा शोध पोलीस ठाण्याची आणि गुन्हे शाखेची पथके घेत आहेत. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.