युक्रेन युद्धाबाबतची कविता गायल्याने कवीला तुरुंगवास

मॉस्को – युक्रेन युद्धावर टीका करणारी एक कविता गायल्यामुळे रशियामध्ये एका कवीला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रशियामध्ये मतभेदांना ठेचून काढले जाते आहे, याचे आणखीन एक मोठे उदाहरण यामुळे पुढे आले आहे.
आर्टविन कामार्दिन असे या कवीचे नाव असून ट्वेर्स्टकी जिल्हा न्यायालयाने त्यांना राष्ट्रीय सुरक्षेला कमी लेखण्याच्या आरोपाखाली आणि द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे.
मॉस्कोच्या उपनगराच्या रस्त्यांवर सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी युक्रेनविरुद्धच्या युद्धावर टीका करणारी कविता सादर केली होती.
याच कार्यक्रमामध्ये कामार्दिन यांची कविता सादर करणाऱ्या यागोर श्तोवबा यांनाही न्यायालयाने याच आरोपांखाली साडे पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
युक्रेनविरुद्धचे युद्ध सुरू झाल्यानंतर पुतीन यांनी ३ लाखांचे राखीव सैन्य सज्ज ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर थोड्याच दिवसात रशियातील कवी व्लादिमिर मायकोवोत्स्की यांच्या पुतळ्यासमोर हा कार्यक्रम झाला होता.
युद्धामुळे सैन्यात भरती व्हायला लागू नये म्हणून हजारो जण रशिया सोडून पळून गेले होते. त्या स्थितीवर या कवितांमधून टीका झाली होती. पोलिसांनी लाठीमार करून कविता सादर करणाऱ्यांना पिटाळून लावले होते. मात्र कामार्दिन आणि अन्य काही जणांना अटक करण्यात आली होती.





