Purandar : महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी भालेराव
Purandar : महात्मा फुले यांचे मूळ गाव असलेल्या कऱ्हा नदीच्या काठावरील खानवडी येथे दरवर्षी या संमेलनाचे आयोजन केले जाते.

सासवड : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण कवी डॉ. इंद्रजीत भालेराव यांची निवड केली आहे. तर, संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पुरंदर तालुका काँग्रेसचे नेते तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरंगे यांची निवड झाली आहे. संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी ही माहिती दिली.
महात्मा फुले यांचे मूळ गाव असलेल्या कऱ्हा नदीच्या काठावरील खानवडी येथे दरवर्षी या संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा हे संमेलन शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड येथे पार पडणार निमंत्रकपदी जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त सुनील असवलीकर यांची निवड केली आहे. संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, कथाकथन, नाट्यप्रयोग आणि कविसंमेलन अशा विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.
संमेलनाच्या नियोजन बैठकीस मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ जगताप, साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष श्यामकुमार मेमाणे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धीवार, भीमथडी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, सचिव दीपक पवार, खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले, रमेश बोरावके, दत्ता होले, संभाजी महामुनी, गंगाराम जाधव, दत्ता कड, अरविंद जगताप, प्रवीण कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कवी भालेराव यांचा साहित्य प्रवास
शेती, माती आणि शेतकरी जीवनातील संघर्ष आपल्या लेखणीतून मांडणारे कवी म्हणून इंद्रजीत भालेराव परिचित आहेत. त्यांचे ‘पीकपाणी’, ‘आम्ही काबाडाचे धनी’, ‘दूर राहिला गाव’, ‘कुळंबिणीची कहाणी’, ‘पेरा’, ‘टाहो’, ‘गावाकडची माती’, ‘भूमीचे मार्दव’, ‘उलगुलान’ हे काव्यसंग्रह आणि ‘बाप’ ही दीर्घकविता विशेष गाजली आहे. याशिवाय त्यांनी ‘मातीशी नाते’, ‘शेती आणि साहित्य’, ‘गावकळा’, ‘नांगराचा फाळ’, ‘मराठी ग्रामीण कविता: स्वरूप आणि चिकित्सा’ हे ललित व समीक्षात्मक लेखन केले असून ‘समकालीन ग्रामीण कविता’ या पुस्तकाचे संपादनही केले आहे.
दत्ता झुरंगे यांचे सामाजिक योगदान
स्वागताध्यक्ष दत्ता झुरंगे हे गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. शिवशंभो पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आणि व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ दिले आहे. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वारकऱ्यांसाठी अन्नदान आणि विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.





