म्हाडा कोकण मंडळाची २४ फेब्रुवारीला सोडत; ५३११ सदनिकांसाठी २५०७८ पात्र अर्जांची संगणकीय सोडत

मुंबई – म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर,रायगड, येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३११ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त २५०७८ पात्र अर्जांची संगणकीय सोडत शनिवार,
दिनांक २४ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात येणार्या या सोडतीला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,
राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.
अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial या पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.





