PMRDA News : ई-गव्हर्नन्स सुधारणेमध्ये पीएमआरडीए तृतीय क्रमांकावर; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
PMRDA News : राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कृती आराखड्यात पीएमआरडीएची चमकदार कामगिरी; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली विजेत्या कार्यालयांची घोषणा.

PMRDA News – राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांची कामगिरी भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या वतीने अंतिम मूल्यमापनात तपासली गेली. या मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. यामध्ये पीएमआरडीएने सर्वोत्तम शासकीय संस्था, मंडळे व कंपन्या या गटातून राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे, तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवून मानाचा तुरा खोवला आहे.
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीएने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. कार्यालयाची अधिकृत वेबसाइट, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन तसेच भौगोलिक माहिती प्रणाली यांचा शासकीय कामकाजातील प्रभावी वापर करून ही निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी १०० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा व धोरणात्मक निर्णयांवर आधारित कार्यक्रम जाहीर केला होता. त्या स्पर्धेतही पीएमआरडीएने राज्यात तृतीय क्रमांक पटकावत आपली कामगिरी अधोरेखित केली होती. या यशानंतर जून २०२५ मध्ये १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कृती आराखडा घोषित केला गेला. या आराखड्यांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांचे दहा विविध स्तरांवर मूल्यमापन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात भारतीय गुणवत्ता परिषदेकडून सखोल तपासणी केली गेली.





