PMRDA News : पीएमआरडीएमध्ये परवानग्यांसाठी नवी नियमावली, आता कामाला येणार वेग..वाचा सविस्तर
PMRDA News : परवानग्या आणि लेआऊट मंजुरीसाठी आता वारंवार पाठपुरावा करण्याची गरज नाही; आयुक्तांचे वेळबद्ध प्रक्रियेचे आदेश

PMRDA News – इमारत उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्या, मंजुरी आणि लेआऊट प्रक्रियेत बांधकाम व्यावसायिकांना अनावश्यक अडथळे येऊ नयेत, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी परवानगी व मंजुरी प्रक्रिया अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि वेळबद्ध करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीत क्रेडाई तसेच विविध बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पीएमआरडीएच्या विविध तालुक्यांमध्ये निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारताना विकास परवानगी विभागाकडून घ्याव्या लागणाऱ्या मंजुरी, सर्व्हेक्षण, लेआऊट आणि अन्य तांत्रिक प्रक्रियांसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागतो, अशी अडचण क्रेडाईच्या वतीने मांडण्यात आली.
बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक आणि गती वाढण्यासाठी या प्रक्रिया अधिक पारदर्शक असाव्यात, एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध व्हावी आणि अनावश्यक हेलपाटे टाळले जावेत, अशी मागणी व्यावसायिकांनी केली. त्यानुसार आयुक्तांनी अंतर्गत समन्वय वाढवणे, फाइल हालचालींचा कालावधी कमी करणे आणि अर्जदारांना स्पष्ट मार्गदर्शन देण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. या निर्णयांमुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळेल, तसेच पीएमआरडीए हद्दीतील विकासकामांना वेग येईल, असा विश्वास बैठकीनंतर व्यक्त करण्यात आला.


