PMRDA News: शासनाचा नियम धाब्यावर? पीएमआरडीएला मराठीचा विसर; इंग्रजीत अंक छापल्याने तीव्र संताप
PMRDA News: विकासकामे, मेट्रो मार्ग-३ आणि अतिक्रमणविरोधी मोहिमेचा आढावा मराठीऐवजी इंग्रजीत; पीएमआरडीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

PMRDA News – राज्य शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय कार्यालयांमध्ये मराठी राजभाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले जात असताना, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) मात्र राजभाषेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. पीएमआरडीएकडून नुकतीच ‘व्हॉइस ऑफ पीएमआरडीए’ ही आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली असून, ती पूर्णपणे इंग्रजी भाषेत आहे.
त्यामुळे पीएमआरडीएच्या कामकाजात मराठी भाषेला किती प्राधान्य दिले जाते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पीएमआरडीएकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आवृत्तीत पुणे महानगर प्रदेशाला आकार देणारी दूरदृष्टी, कृती आणि परिवर्तन यांचा आढावा घेण्यात आला आहे. पावसाळ्यातील पीडीआरएफच्या जीवनरक्षक बचाव कार्यांपासून मोई येथील पीएमआरडीएच्या ऐतिहासिक अतिक्रमणविरोधी मोहिमेपर्यंत,
तसेच पुणे महानगर प्रदेशासाठी असलेल्या २० वर्षांच्या विकेंद्रित विकासाच्या दूरदृष्टीपर्यंत विविध बाबींचा या आवृत्तीत समावेश करण्यात आला आहे. लवचिक पायाभूत सुविधा, शाश्वत शहरी नियोजन, पारदर्शक प्रशासन आणि नागरिककेंद्री विकासाप्रती पीएमआरडीएची वचनबद्धता या माध्यमातून मांडण्यात आली आहे.
यासोबतच पीएमआरडीएच्या महत्त्वाच्या टप्प्यांचा, प्रमुख कार्यक्रमांचा, तांत्रिक उपक्रमांचा, यूडीसीपीआरच्या अवलंबाचा, तसेच मेट्रो लाइन- ३ च्या अद्ययावत माहितीचाही या आवृत्तीत समावेश करण्यात आला आहे. पुणे महानगर प्रदेशाला अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि शाश्वत भविष्यात नेणाऱ्या विविध उपलब्धींची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे.
मात्र, पीएमआरडीएने या महत्त्वाच्या उपक्रमाची मराठी भाषेतील आवृत्ती प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे पुणे महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी असलेल्या माहितीपत्रिकेत मराठीला स्थान का दिले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. राज्य शासनाकडून मराठी राजभाषेचा वापर वाढविण्यावर भर दिला जात असताना, पीएमआरडीएच्या या इंग्रजी आवृत्तीमुळे प्रशासनाच्या भाषाविषयक भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





