PMRDA Election: निकालात भाजपचे ‘वर्चस्व’; महाविकास आघाडीत ‘फुट’ पडल्याची चर्चा

पुणे – महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुणे महानगर प्रादेशिक नियोजन समितीच्या (पीएमआरडीए) पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरी क्षेत्रातील निवडणूकांच्या निकालाने महापालिकेची राजकीय समिकरणे बदलणार आहेत. या निवडणूकांच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातील नाराज राष्ट्रवादीच्या गोटात येतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, विरोधीपक्षांचा हा दावा भाजपने मोडीत काढत नागरी क्षेत्रीतील 22 मधील 14 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. त्याच वेळी, आघाडीच्या विनंतीला नकार देत शहरातून कॉंग्रेसकडून उभे करण्यात आलेला उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे, किमान पुण्यात तरी आघाडीत फूट पडल्याची चर्चा आहे. मात्र, या पराभवानंतरही कॉंग्रेसने आपल्या निर्णयाचे समर्थन केले असून कॉंग्रेसला पक्ष वाढीचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले असून 22 मध्ये राष्ट्रवादीला 7 तर शिवसेनेला 1 जागा मिळाली आहे.
पुणे महानगर नियोजन समितीच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड नागरी क्षेत्रात असलेल्या 23 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे संख्या व अतिरिक्त संख्याबळ पाहता या 22 जागामध्ये राष्ट्रवादीचे 7, भाजपचे 14 आणि शिवसेनेचा 1 सदस्य मतांच्या कोट्यानुसार निवडून जाणार हे अपेक्षित होते.
पिंपरीत कॉंग्रेसचे 0 नगरसेवक आहेत. पुण्यात 10 सदस्य आहेत. तर निवडून येण्याचा कोटा 13 मतांचा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नागरी गटातील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांनी ग्रामीण गटातून जिल्ह्यात कॉंग्रेसला एक जागा देऊ केली केली होती. मात्र, कॉंग्रेसच्या काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पवारांचा हा प्रस्ताव धुडकावून नगरसेवक चंदूशेठ कदम यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नव्हती, त्यावरून महाविकास आघाडीत थेट फूट पडली आहे. त्याच वेळी राष्ट्रवादीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये भाजपची मते फूटली असून त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल, असा दावा करण्यात येत होता. मात्र, हा दावाही खोटा ठरला असून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, भाजपच्या 14 व्या उमेदवाराला केवळ एका मताने विजय प्राप्त करता आलेला आहे, त्याच वेळी राष्ट्रवादीचे एक मत फुटल्याचेही समोर आले आहे.
या निवडणूकीसाठी नागरी क्षेत्रात नगरसेवक हे मतदार होते. त्यामुळे आगामी पालिका निवडणूकांच्या तोंडांवर भाजपमधील नाराज नगरसेवक राष्ट्रवादीच्या बाजूने येतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, तसेच काहीच न घडल्याने भाजप मधून कोणतेही आऊट गोईंग अथवा त्याचा प्रयत्न कोणी करत नसल्याचे भाजपने दाखवून दिले आहे. त्याच वेळी कॉंग्रेसने आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या विनंतीला झुगारत उमेदवार उभा केल्याने आघाडी संपल्याचे राष्ट्रवादी थेट सांगत आहे. परिणामी, आघाडीतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम पालिकेच्या निवडणूकीवर होणार असल्याची चर्चा आहे.
“आगामी महापालिका निवडणूकीच्या तोंडावर भाजपच्या नगरसेवकांना फोडण्याच्या राष्ट्रवादीने केलेल्या वल्गना हवेतच विरल्या आहेत. विरोधकांचे हे दिवास्वप्न स्वप्नच राहणार असून त्यांची स्थिती “मुंगेरीलाल के हसीन सपनें’ अशी झाली आहे. त्यामुळेच 22 मध्ये 14 जागा मिळवित भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.”
– जगदिश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप
“या निवडणूकीत भाजपच्या शेवटच्या उमेदवाराला 10 तर कॉंग्रेसच्या उमेदवाराला 9 मते मिळाली. कॉंग्रेसला आणखी एक मत मिळाले असते तर टायब्रेक होऊन कॉंग्रेसच्या उमेदवार निश्चित निवडून आला असता. याचे आत्मपरिक्षण कॉंग्रेस नक्की करेल. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश, नवचैतन्य निर्माण झाले असून महापालिका निवडणूका आम्ही अधिक समर्थपणे लढवू यांचा आम्हाला विश्वास आहे.”
– आबा बागूल, कॉंग्रेसचे गटनेते
“मतांच्या कोट्यानुसार राष्ट्रवादीचे 7 तर शिवसेनेचा 1 उमेदवार निवडून येणार हे निश्चित होते. त्यामुळे कॉंग्रेसने उमेदवार देऊ नये यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र, त्यानंतरही कॉंग्रेसने उमेदवार देऊन आघाडीत बिघाडी केली. पण स्वत:चे नुकसान करून घेतले आहे. राहिला प्रश्न भाजपमधील नाराजांचा लवकरच भाजपला ते दिसण्यास सुरूवात होईल तसेच त्यांचे धक्काहे बसतील.”
– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस





