PMRDA : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मेट्रो प्रवास
PMRDA: पहिले तिकीट घेऊन विद्यार्थिनी, आयटीयन्सशी साधला संवाद

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पीपीपी तत्त्वावरील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन आणि पुणे मेट्रो फेज- २ च्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोतून प्रवास केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी ते हिंजवडी फेज- २ असा प्रवास करत त्यांनी विद्यार्थी, आयटीयन्सशी संवाद साधला.
या वेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांना मेट्रो मार्ग, स्थानके आणि प्रकल्पाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली.
या प्रवासात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी- चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
या प्रवासाचे विशेष आकर्षण म्हणजे पिंक मेट्रोचे संचालन महिला ट्रेन पायलटकडे होते. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी मेट्रोचे सारथ्य केले, तर ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनीही या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. यानिमित्ताने आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिलांच्या योगदानाचे दर्शन घडले.
प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो प्रवासाचा अनुभव, उपलब्ध सुविधा आणि नव्या मार्गामुळे दैनंदिन प्रवासात होणारे फायदे याविषयी जाणून घेतले. मुख्यमंत्री व मान्यवरांनी हिंजवडी फेज-२ मेट्रो स्थानकापर्यंत सुमारे सहा किलोमीटरचा प्रवास केला.
महिला ट्रेन पायलटच्या नेतृत्वाखाली झालेला प्रवास आणि विद्यार्थिनींसह विविध क्षेत्रांतील नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी साधलेला संवाद यामुळे हा क्षण विशेष ठरला.





