PMPML News: रक्षाबंधनाला पीएमपीएमएलची बंपर कमाई! एकाच दिवसात तिजोरीत जमा झाले ‘इतके’ कोटी
PMPML News: सणाच्या दिवशी ६५३ स्वतःच्या अन् १,३२८ भाडेतत्त्वावरील बसेस रस्त्यावर उतरवत पीएमपीएमएलने पुरवली विनासायास प्रवासी सेवा.

PMPML News – रक्षाबंधन सणानिमित्त भाऊ-बहिणींच्या भेटीगाठींसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने सार्वजनिक वाहतुकीवर प्रवाशांचा मोठा भार राहिला. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन पीएमपीएमएलने रक्षाबंधनच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बससेवा उपलब्ध करून दिली. दोन्ही शिफ्टची सरासरी धरता तब्बल १ हजार ९२२ बस रस्त्यावर धावल्या.
या दिवशी तिकीट विक्री, पास, पुणे दर्शन व पर्यटन तसेच मोबाईल ॲपमधून मिळालेल्या उत्पन्नासह पीएमपीएमएलच्या तिजोरीत २ कोटी ४५ लाख १३ हजार ३७२ रुपयांची भर पडली. रक्षाबंधनच्या दिवशी सकाळपासूनच विविध मार्गांवर प्रवाशांची गर्दी वाढली होती. बहिणींना भेटण्यासाठी तसेच कुटुंबीयांसह प्रवास करण्यासाठी नागरिकांनी पीएमपीएमएल बससेवेला पसंती दिली. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना बस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मोठ्या संख्येने बस मार्गावर ठेवण्यात आल्या.
पीएमपीएमएलच्या ५९४, तर भाडेतत्त्वावरील १,३२८ बस
रक्षाबंधनच्या दिवशी पीएमपीएमएलच्या ताफ्यातील ६५३ बसपैकी ५९४ बस रस्त्यावर धावल्या. तसेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या १ हजार ३८८ बसपैकी १ हजार ३२८ बस प्रवासी सेवेत कार्यरत होत्या. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या बस मिळून एकूण १ हजार ९२२ बस रस्त्यावर होत्या.
तिकीट विक्रीतून दोन कोटींचे उत्पन्न,रक्षाबंधनच्या दिवशी पीएमपीएमएलला मिळालेल्या उत्पन्नात तिकीट विक्रीचा सर्वाधिक वाटा राहिला. रोख तिकीट विक्रीतून तब्बल २ कोटी ६ लाख ८४ हजार ८३ रुपये उत्पन्न मिळाले. प्रवाशांनी विविध प्रकारच्या पासचा वापर केल्याने त्यातूनही ९ लाख ९८ हजार ८९० रुपये मिळाले.
याशिवाय पुणे दर्शन व पर्यटन सेवेतून ४३ हजार रुपये, तर मोबाईल ॲपच्या माध्यमातून २७ लाख ८७ हजार ३९९ रुपये उत्पन्न मिळाले. या सर्व रकमा मिळून रक्षाबंधनच्या दिवशी पीएमपीएमएलचे एकूण रोख उत्पन्न २ कोटी ४५ लाख १३ हजार ३७२ रुपये झाले.
तपासणी पथकांकडून दंडाचीही वसुली
प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर तिकीट तपासणीवरही पीएमपीएमएलने लक्ष केंद्रित केले. मुख्यालय-१ च्या तपासणी पथकाकडून २६ हजार ५०० रुपये, तर मुख्यालय-२ च्या तपासणी पथकाकडून ४४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
रक्षाबंधनसारख्या सणाच्या दिवशी खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहतुकीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. त्यामुळे पीएमपीएमएलच्या बससेवेवरील प्रवाशांचा भार वाढतो. यंदाही मोठ्या संख्येने बस उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना त्यांच्या प्रवासासाठी पर्याय उपलब्ध झाला. वाढलेल्या प्रवासी संख्येचा थेट परिणाम पीएमपीएमएलच्या उत्पन्नावरही झाला असून, एकाच दिवसात अडीच कोटींच्या जवळपास उत्पन्न मिळाले आहे.






