PMC Road Digging: गणेशोत्सवापर्यंत रस्ता खोदकामांना बंदी ! पूर्वी खोदलेले रस्ते तातडीने बुजवण्याचे आदेश जारी
PMC Road Digging: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात नव्या रस्ता खोदाईस पूर्णपणे बंदी; आधीची कामे तातडीने पूर्ण करून रस्ते समतल करण्याचे निर्देश.

PMC Road Digging – गणेशोत्सवात शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. खासगी कंपन्या, पाणीपुरवठा, ड्रेनेज, महावितरण आणि अन्य युटिलिटी विभागांनी गणेशोत्सव संपेपर्यंत नवीन रस्ता खोदाई करू नये. तसेच यापूर्वीची खोदाईची कामे तातडीने पूर्ण करून रस्ते समतल करावेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
आमदार हेमंत रासणे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संयुक्त पाहणीत हे निर्देश दिले. कसबा व विश्रामबाग वॉर्ड कार्यालयाच्या हद्दीतील प्रमुख गणेश मंडळे, मिरवणूक मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. यावेळी रस्त्यांची अवस्था, खड्डे, पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था, पदपथ, अतिक्रमणे आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
कसबा गणपती मंदिरापासून पाहणीस सुरुवात करून शिवाजी रोड, भाऊ रंगारी गणपती, तांबडी जोगेश्वरी, केळकर रोड, पासोड्या विठोबा, सोन्या मारुती, सोमेश्वर मंदिर, महाराणा प्रताप रस्ता, कस्तुरी चौक, जैन मंदिर, नाईक हॉस्पिटल, फडके पोलिस चौकी, सेवा मित्र मंडळ, मंडई गणपती, दगडूशेठ देखावा, गुरूजी तालीम,
लक्ष्मी रस्ता, पुरम चौक परिसरात पाहणी करण्यात आली. मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर, उपायुक्त (अतिक्रमण) सोमनाथ बनकर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संतोष वारुळे, अधीक्षक अभियंता (पथ) रोहिदास गव्हाणे यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.





