PMC Protest: रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? महापालिकेत विरोधकांचे जोरदार ठिय्या आंदोलन
PMC Protest: कागदोपत्री आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीत मोठी तफावत; तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी दर्जेदार रस्ते दुरुस्तीची आग्रही मागणी.

PMC Protest – शहरातील वाढत्या खड्ड्यांवरून महापालिकेच्या मुख्यसभेत बुधवारी विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन केले. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?, पुणेकरांना चांगले रस्ते मिळालेच पाहिजेत, खड्डेमुक्त पुणे झालेच पाहिजे आणि रस्ते आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देत महापालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाग घेतला.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे गटनेते काका चव्हाण, काँग्रेसचे गटनेते ॲड. चंदू कदम यांच्यासह तिन्ही पक्षांचे नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले. पावसाळ्यामुळे शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप केला. डांबरीकरण नाही, खड्डे दुरुस्ती नाही, अशा घोषणा देण्यात आल्या. महापालिकेने शहरातील बहुतांश खड्डे बुजवल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. कागदोपत्री आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत आहे. खड्ड्यांमुळे अपघात, वाहतूक कोंडी तसेच वाहनांचे नुकसान वाढत असल्याने प्रशासनाने तात्पुरत्या उपायांऐवजी दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्ते दुरुस्तीची मागणी यावेळी करण्यात आली.





