PMC News : महापालिकेकडून थकीत मिळकतकर वसूलीसाठी येत्या वर्षात थकबाकीदारांवरर कडक कारवाई करण्याचे सूतेवाच महापालिका आयुक्तांनी केले आहे. एकीकडे पालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत घटत असतानाच दुसरीकडे मिळकतकराची थकबाकी जवळपास १७ हजार कोटींच्या घरात पोहचली आहे. थकबाकी भरण्यासाठी नागरिकांना गेल्या काही वर्षात अनेकदा अभय योजना राबवूनही त्यांच्याकडून पैसे भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, थकबाकी वाढतच असून पुढील आर्थिक वर्षात थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचे सुतेवाच आयुक्तांनी केले आहे. आयुक्त म्हणाले की, मिळकतकर हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. मात्र, महापालिकेस या विभागाकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. लाखो मिळकतींची कर आकारणी झालेली नाही. तसेच कर आकारणीतही चुका आहेत. त्यामुळे थकबाकीचा डोंगर वाढत आहे. या थकबाकी वसुलीसाठी पुढील वर्षभरात विशेष मोहीम राबविली जाईल. आतापर्यंत नागरिकांना सवलत दिली जात होती. त्यातून गेल्या दोन महिन्यात १ हजार कोटींचे उत्पन्नही मिळाले आहे. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष उत्पन्न वाढलेले नाही. त्यामुळे यापुढे थकबाकीदारांवर कडक कारवाई केली जाणार असून त्यासाठी धोरणच तयार केले जाईल.