PMC News – महापालिकेकडून येत्या १ एप्रिल पासून नव्याने कर आकारणी करण्यात येणाऱ्या मिळकतींच्या वाजवी भाड्याचा दरात ५ टक्के वाढ करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी या दरवाढीस मान्यता दिली आहे. त्यामुळे नवीन मिळकतींच्या करात वाढ होणार आहे. ही वाढ अल्प असली, तरी महापालिकेस त्या माध्यमातून काही प्रमाणात उत्पन्नवाढीस मदत होणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण ८ नियम ७ नुसार दरमहा प्रतिचौरस फुटास वाजवी भाड्याचा दर एकूण ५३ विभागांत ६०० भागांमध्ये निवासी (आर.सी.सी., लोड बेरिंग, साधे पत्राशेड), बिगर निवासी (आर.सी.सी., लोड बेरिंग, साधे पत्राशेड), पार्किंग (निवासी/ बिगर निवासी) या मिळकतींच्या प्रकारात निश्चित करण्यात आले आहेत. हे दर जागेच्या आकारानुसार प्रतिचौरस फुटाप्रमाणे आकारले जातात. अशी होणार वाढ महापालिकेकडून निवासी मिळकतींसाठी वाजवी भाड्याचे दर पालिकेने निश्चित केलेल्या झोन नुसार २.५० पैशांपासून ५ रुपयांपर्यंत आहेत, तर व्यावसायिक कर आकारणीसाठी हे दर ४.५० रुपये ते १४ रुपये आहेत. समजा तुमचे घर ज्या झोनमध्ये आहे. त्या भागात वाजवी भाड्याचा दर ३ रुपये असल्यास त्यावर ५ टक्के म्हणजेच फक्त पंधरा पैशांची वाढ होऊन तुम्हाला ३.१५ पैसे प्रतिचौरस फूट दराने कर आकारला जाईल. महापालिका आयुक्तांना या दरात वाढ करण्याचे अधिकार असल्याने त्यानुसार ही दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ पुढील आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मिळकतदरांनी याची नोंद घेऊन कर आकारणी न झालेल्या, वाढीव बांधकाम केलेल्या, मोकळ्या जागा असलेल्या, वापरात बदल केलेल्या मिळकतींची कर आकारणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या कर संकलन विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी केले आहे.