PMC News – पावसाळा तोंडावर आला असून त्याचे लवकर आगमन होऊ शकतो. असे असताना पावसाळी जलवाहिन्या, चेंबर, कल्व्हर्ट आणि नाले सफाईचे काम केवळ ३५ टक्केच झाले आहे. यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे पावसाने लवकर हजेरी लावली तर पुणेकरांची दाणादाण उडणार हे निश्चित आहे. यावर्षी दोन एप्रिल रोजी आलेल्या जोरदार अवकाळी पावसाने पुणेकरांना चांगलेच झोडपले. नवश्या मारूतीजवळ झाड पडून एका महिलेला जीवही गमवावा लागला. पावसाने सगळीकडे पाणीचपाणी झाले. पावसाळी लाइन, गटारे तुडुंब भरून वाहत होती. याशिवाय अनेकांच्या घरात, आस्थापनांत पाणी घुसून नुकसानही झाले. त्यावेळी महापौरांनी बोलावलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत काही ठिकाणी ९० टक्के कामे झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. प्रत्यक्षात ही कामे दहा टक्केही झाली नाहीत. पुणे महापालिका यामुळे महापौरांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत पावसाळी कामे तातडीने करण्याचे आदेश दिले. त्याविषयीच्या सर्व निविदा स्थायी समितीनेही तातडीने मंजूर केल्या. शिवाय मंजुरी मिळेल या भरवशावर अनेक कामांना सुरूवात करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कामांना सुरूवातही झाली. परंतु, महिना उलटून गेला तरी अद्याप ३५ ते ३८ टक्केच कामे झाल्याचे चित्र प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसते. क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ही कामे सुरू आहेत, पाच परिमंडळांच्या अखत्यारित ही कामे येतात. याचा आढावा घेतला जात आहे. गेल्या महिनाभरात एवढेच टक्के जर काम झाले असेल तर मे अखेर किती कामे होतील याचा अंदाज न केलेलाच बरा. एकूण दोन लाख ७५ हजार ०९५ मीटर लांबीच्या पावसाळी जलवाहिन्यांतील केवळ ८३ हजार ४४९ पावसाळी जलवाहिन्या स्वच्छ झाल्या आहेत. ६२ हजार २८२ चेंबर पैकी २१, ५९३ चेंबर स्वच्छ केले आहेत. नाले सफाईमध्येही दोन लाख ३२ हजार २८२ मीटर लांबीच्या नाल्यांपैकी ८३ हजार ३२४ नालेसफाई झाली आहे. महापालिका हद्दीत एकूण ४५४ कल्व्हर्ट आहेत, त्यातील १४८ कल्व्हर्ट साफ करणे अपेक्षित आहे. त्यातील १०६ कल्व्हर्ट साफ केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.