PMC News – महापालिका प्रशासनाने निविदा काढण्यास उशीर झाल्याचे सांगत पावसाळी कामांच्या निविदा स्थायी समितीत मंजूर होण्याआधीच महापालिका प्रशासनाने शहरात नालेसफाई, तसेच पावसाळी कामे सुरू केली आहे. मात्र, या निविदा अद्यापही स्थायी समितीच्या मान्यतेसाठी आलेल्या नाहीत. त्यामुळे ही कामे सुरू झाली की नाही, तसेच निविदा मान्यतेसाठी का ठेवल्या नाहीत, याबाबत मला काहीच माहिती नाही, अशी धक्कादायक कबुली महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला अंधारात ठेवत तब्बल ४५ कोटींच्या कामांना सुरुवात केली का; अथवा स्थायी समितीकडून कमी दराच्या निविदांमुळे समितीची कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या मंजुरीसाठी येऊ न दिल्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शहरात प्रत्येक वर्षी पावसाळापूर्व कामे योग्य होत नसल्यामुळे ओरड होते. नाले तुंबतात, रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे यावर्षी कामे व्यवस्थित व्हावीत, त्याचबरोबर निविदांमधील गोंधळ कमी व्हावा, याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महापालिका प्रत्येक वर्षी निविदा ८ ते ५२ टक्के कमी दराने येतात. त्यामुळे खरंच कामे होतात का, असा संशय निर्माण होतो. आता तर निविदा मंजुरीआधीच कामांना सुरुवात झाल्यामुळे यामागचे गौडबंगाल उघड होऊ शकले नाही. पावसाळीपूर्वी कामे ही अत्यावश्यक यादीत असल्यामुळे प्रशासन कामे करून ६७, ३ क अंतर्गत स्थायीसमोर प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. स्थायी समितीची कोंडी स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीपासून समिती अध्यक्षांसह समिती सदस्यांनी कमी दरांच्या निविदांवरून प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर १० टक्क्यांपेक्षा कमी दराच्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत, तसेच प्रशासनाने कमी दरांच्या निविदा आळा घालण्यासाठी नियमावली करावी, अशा सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. मात्र, आता पावसाळी कामांच्या निविदा पुन्हा ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आधी दरांबाबत प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या स्थायी समितीची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे या निविदा मान्यतेसाठी आणल्या जात नसल्याची चर्चा आहे.