PMC News – वृक्षगणनेसाठी सुमारे ३० कोटींच्या निविदेवरून महापालिकेच्या स्थायी समितीत पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी झाली. यापूर्वी स्थगिती दिलेल्या या निविदेला वर्क ऑर्डर देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवित न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. त्यानंतर प्रशासनाने निविदेवरील स्थगिती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तर निविदेला यापूर्वी स्थगिती दिली असताना वर्क ऑर्डर देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली. बैठकीत आम्ही त्याला ठाम विरोध केला. प्रशासनाने आता स्थगिती कायम ठेवण्याचे सांगितले असले, तरी परस्पर निर्णय घेतल्यास न्यायालयात दाद मागू, असा इशारा काॅंग्रेसचे स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप यांनी दिला आहे. मिळकत कराच्या जीआयएस मॅपिंगमध्ये गंभीर त्रुटी झाल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या मे. सार आयटी रिसोर्सेस या कंपनीलाच सुमारे २९ कोटी ८७ लाखांचे वृक्षगणनेचे कंत्राट देण्यात आले होते. या कामात झालेल्या चुका लक्षात घेता कंपनीचे १२ कोटी रुपये महापालिकेने जप्त केले आहेत. त्यामुळे या कंपनीला पुन्हा कंत्राट देण्यास सदस्यांनी आक्षेप घेतला होता. प्रशासक राजवटीच्या अखेरीस मंजूर झालेल्या या निविदेला स्थायी समितीने यापूर्वी स्थगिती दिली होती. मात्र, त्यानंतरही वर्क ऑर्डर देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा रंगली. हा विषय उघडकीस आल्यानंतर गुरुवारी झालेल्या बैठकीत सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी या संदर्भात सविस्तर प्रेझेंटेशन सादर केले जाईल, असे सांगितले. तसेच, सध्या निविदेवरील स्थगिती कायम ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो होऊ शकला नाही. या प्रकरणात स्थायी समिती अध्यक्ष आणि काही अधिकारी यांच्याकडून निविदा पुढे रेटण्याचा प्रयत्न झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे.