PMC News : महापालिकेत स्वीकृत सदस्यांची वर्णी; भाजपकडून ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब
PMC News : तांत्रिक कारणास्तव रखडलेली निवड आता मार्गी; सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर.

PMC News – महापालिकेतील उर्वरीत दोन स्वीकृत सदस्यपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून जयप्रकाश पुरोहित आणि प्रियांका शेंडगे- शिंदे यांचे नामनिर्देशन अर्ज महापालिका आयुक्तांकडे दाखल करण्यात आले. सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे नामनिर्देशन अर्ज महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सादर करण्यात आले.
या सदस्यांची नियुक्ती महापालिकेच्या येत्या २० एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्य सभेत केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीनंतर पक्षीय बलाबलानुसार महापालिकेत स्वीकृत सदस्यांची निवड मार्च महिन्याच्या मुख्य सभेत करण्यात आली. पक्षीय बलाबलानुसार भाजपकडे सात, राष्ट्रवादीला दोन, तर काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. या जागांसाठी मागील महिन्यात ९ मार्च रोजी अर्ज मागविण्यात आले होते.
त्या वेळी भाजपच्या सातमधील पुरोहित आणि शेंडगे यांचे अर्ज मुदतीत कागदपत्रे सादर न केल्याने बाद झाले होते. मात्र, या दोन्ही जागा भाजपच्याच असल्याने या दोन्ही सदस्यांची निवड होणार, हे निश्चित होते. उर्वरीत दोन सदस्य एप्रिल महिन्याच्या मुख्य सभेत नियुक्त करायचे असल्याने महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी सभागृह नेत्यांना पत्र पाठवून अर्ज भरण्याची तारीख कळविली होती. त्यानुसार या दोन्ही उमेदवारांचे अर्ज गुरुवारी सादर करण्यात आले.





