PMC News : पिंपरीत न्याय, मग पुण्यात अन्याय का? निवडणूक भत्त्यावरून महापालिकेत अधिकारी-कर्मचारी वाद पेटला
PMC News : निवडणूक आयोगाच्या आदेशांना केराची टोपली? पुणे महापालिकेत भत्त्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे नियम.

PMC News – पुणे महापालिकेच्या निवडणुका होऊन दोन महिने झाले असले, तरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जादा वेळ काम केल्याबद्दल दिला जाणारा मोबदला अद्याप दिलेला नाही. हा मोबदला देताना निवडणूक विभागाकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळी नियमावली लागू करण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना हा भत्ता देण्यासाठी जाचक अटी व शर्ती लावण्यात आल्याने कर्मचारी नाराज आहेत.
प्रशासनाने तातडीने हे नियम रद्द करून सर्वांना समान पद्धतीने भत्ता द्यावा, अशी मागणी पीएमसी एम्प्लॉयी युनियनच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. जानेवारी २०२६ मध्ये महापालिका निवडणुका पार पडल्या. यासाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या टप्प्यांवर सुमारे २० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जुलै २०२५ च्या मूळ वेतनानुसार अतिकालिक भत्ता,
परिश्रमिक भत्ता आणि मानधन देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, निवडणुका पार पडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामाच्या तासांचा मोबदला देताना प्रशासनाकडून दिवसाला केवळ तीन तास आणि एकूण कालावधीत जास्तीत जास्त १६५ तासांपर्यंतच मोबदला देण्याचे आदेश काढले आहेत. याशिवाय त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अटी व शर्ती घातल्याने कर्मचाऱ्यांना मानधन मिळविताना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकारी आणि कर्मचारी असा कोणताही भेदभाव न करता निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार संबंधित भत्ते देण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर पुणे महापालिकेतही सर्वांना समान लाभ द्यावा, तसेच निवडणूक विभागाने काढलेले संबंधित आदेश व परिपत्रके रद्द करावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.





