PMC News : महापालिकेच्या मिळकती, पूल, पादचारी पूल तसेच पथदिव्यांवरील जाहिरात फलकांसाठी जागा देण्याबाबत जाहिरातदार कंपन्यांकडून मागविलेल्या प्रस्तावावरून पालिका प्रशासन आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या सोमवारी मुख्यसभा सुरू असतानाच जोरदार खडाजंगी उडाली. मुख्यसभेत नगरसेवक आपले मुद्दे मांडत असताना भिमाले, महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांमध्ये थेट शाब्दिक खडाजंगी झाली. हा प्रकार मुख्यसभेत पत्रकार कक्षात बसलेल्या पत्रकारांच्याही निदर्शनास आला. त्यामुळे या जाहिरात प्रस्तावावरूनच वाद झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, उपस्थित अधिकाऱ्यांनी या वादाला दुजोरा दिला असला तरी भिमाले मात्र यांनी हा असा प्रकार घडला नसल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना केला आहे. काय आहे प्रकार ? गेल्या काही वर्षांत पालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादित झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मिळकती ३२ विभागांत विभागण्यात आल्या असून तेथील ४ हजार २३ ठिकाणी जाहिरातींसाठी जागा दिली जाणार आहे. या सर्व जागांसाठी एकच कंपनी नियुक्त केली जाणार आहे. या प्रस्तावात सहभागी होण्यासाठी संबंधित कंपनीची जाहिरात व्यवसायातील उलाढाल किमान १०० कोटी रुपये असावी आणि ती सलग पाच वर्षे टिकून असावी, अशी अट घातली आहे. नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त तसेच संबंधित कंपनीकडून कोणतेही भाडे न आकारता, जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ३० टक्के हिस्सा पालिकेला देण्याची अट आहे.त्यामुळे, संबधित कंपनीने तोटा दाखविल्यास अथवा कमी उत्पन्न दाखविल्यास पालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे, पालिकेने ज्या कंपनीस हे काम दिले जाईल. त्यांनी संबधित वर्षात किती जीएसटी भरला ही माहिती देण्याची अट घातली. या अटीला भिमाले यांचा विरोध असून त्यांनी प्रस्तावात कोणताही बदल करू नये, आमचे तुम्हाला ऐकावे लागेल, नाहीतर उद्यापासून आम्ही आमने-सामने असू. तुम्ही जिथून आलात तेथे परत जावे लागेल, असा धमकीवजा इशारा दिला. त्यानंतर आयुक्तांनीही जे करायचे ते करा.. असे धमकावू नका, अशा शब्दात भिमाले यांना सुनावले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. “मी माझ्या तीन-चार प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो. आमच्यात कोणतेही वाद झालेले नाहीत. ही माहिती चुकीची आहे.” – श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष