PMC News : मिनी महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समित्यांचे अध्यक्ष मिनी महापौर म्हणून ओळखले जातात. या १५ प्रभाग समित्यांमधील १४ समित्यांवर भाजपचे अध्यक्ष असणार आहेत. तर केवळ एक प्रभाग समिती काॅंग्रेसच्या वाट्याला येणार आहे. तर महापालिकेत २७ नगरसेवक निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काॅंग्रेसला एकही समिती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभाग रचनेप्रमाणेच प्रशासनाने केलेली प्रभाग समित्यांची रचनाही भाजपच्या पथ्थ्यावर पडल्याचे चित्र आहे. तर महापालिका हद्दवाढ झाल्याने क्षेत्रीय कार्यालयांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तर क्षेत्रीय कार्यालयांची संख्या ही लोकसंख्येनुसार करावी, अशी कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार २४ लाख लोकसंख्येसाठी १२ क्षेत्रीय कार्यालये तर त्यानंतरच्या प्रत्येक सहा लाख लोकसंख्येसाठी एक क्षेत्रीय कार्यालय असावे, असा नियम आहे. महापालिकेची लोकसंख्या ही ३६ लाखांपेक्षा अधिक आहे. त्यानुसार १५ क्षेत्रीय कार्यालये तयार करण्यात आली असल्याने क्षेत्रीय कार्यालयांची संख्या कायम राहिली आहे. तर वाघोली, लोहगाव या गावांचा समावेश नगररोड, येरवडा क्षेत्रीय कार्यालयात, मांजरी भागाचा समावेश हडपसरमध्ये, आंबेगाव पठारचा समावेश धनकवडी, शिवणे, खडकवासला, किरकटवाडी भागाचा समावेश सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आला आहे. केवळ एकच प्रभाग समिती काॅंग्रेसला पक्षीय बलाबलानुसार, १५ मधील केवळ वानवडी-रामटेकडी या एकाच क्षेत्रीय कार्यालयाची प्रभाग समिती काॅंग्रेसच्या वाट्याला येत आहे. या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रभाग १८ आणि १९ समावेश असून त्यात, आठ नगरसेवकांमध्ये काॅंग्रेसचे पाच तर भाजपचे तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे या ठिकाणी काॅंग्रेसचा प्रभाग समिती अध्यक्ष होणार आहे. तर ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून प्रभाग सहा वगळण्यात आले असल्याने ढोले पाटील रस्ता प्रभाग समिती काॅंग्रेसच्या हातून गेली आहे. तर, राष्ट्रवादीलाही त्याचा फटका बसला आहे.