पुणे – प्रभाग क्रमांक २४ ( कसबा गणपती- कमला नेहरू- केईएम हॉस्पिटलमध्ये) राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष उस्मान भाई तांबोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पॅनल प्रमुख माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी हा प्रवेश घडवून आणल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवार सुजाता शेट्टी यांच्यासह इतर उमेदवारांना तांबोळी यांच्या संघटन कौशल्याचा फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रवेश करून घेतला. माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी, वीरेंद्र किराड यावेळी उपस्थित होते. तांबोळी यांच्या प्रवेशामुळे मंगळवार पेठ, रास्ता पेठेचा काही भाग, क्वार्टरगेट, तसेच आसपासच्या परिसरात राष्ट्रवादीला फायदा होणार असून, त्यांच्या प्रवेशामुळे आपला विजयाचा मार्ग आणखी सुकर होणार असल्याची भावना उमेदवार सुजाता शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शेट्टी यांच्या प्रचारार्थ रविवारी बरके अळी, सारस्वत काॅलनी, माळी महाराज मठ, महावितरण सोसायटी, समर्थ पोलीस स्टेशनमार्गे, मराठी सम्राट हाॅटले, एअरटेल, सोमजी पंप शेजारून, लाल देऊळ सोसायटी, गीता सोसायटी, जावेदभाई घरामार्गे, क्वार्टर गेटपर्यंत प्रचारफेरी काढली. या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.