PMC News: खर्चाची नाही…र्गीकरणाची समिती? ११० कोटींच्या कामांत फेरबदल; महापालिकेत चाललंय काय?
PMC News: पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत तब्बल १०२ निधी वर्गीकरणाचे प्रस्ताव दाखल; ११० कोटींपेक्षा अधिक निधीची कामे बदलण्याचा नगरसेवकांचा प्रयत्न.

PMC News – महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात असलेल्या स्थायी समितीने महापालिकेचे उत्पन्न आणि खर्चाचा समतोल साधत शहराच्या विकासावर परिणाम करणाऱ्या अंदाजपत्रकातील प्रस्तावित कामे मार्गी लावणे अपेक्षित असते. त्याच उद्देशाने स्थायी समिती अध्यक्षांकडून शहराचे अंदाजपत्रक मांडले जाते. मात्र, नगरसेवकांकडून आपल्याच प्रभागात अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेल्या शेकडो कामांच्या निधीचे वर्गीकरणाचे प्रस्ताव स्थायी समितीत दाखल करण्यात आले आहेत.
या प्रस्तावांची संख्या तब्बल १०२ असून, वर्गीकरणाची मागणी केलेला निधी तब्बल ११० कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे स्थायी समितीत केवळ वर्गीकरणच होणार, की शहराच्या विकासाची कामे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या पाच स्वीकृत सदस्यांना शहरात विकासकामे करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षांनी प्रत्येकी अडीच कोटींचा निधी दिला होता.
या निधीचे वर्गीकरण करून त्यात कोणती कामे करायची, याचे ठराव देण्यात आले आहेत. अनेक नगरसेवकांना आपणच चार महिन्यांपूर्वी अंदाजपत्रकात सुचविलेली कामे प्रभागात होणार नसल्याचा साक्षात्कार झाल्याने ६० ते ७० नगरसेवकांनी आपला निधी इतर कामांसाठी देण्याचा प्रस्ताव दिला आहे.
स्थायी समितीच्या भूमिकेकडे लक्ष
महापालिकेची स्थायी समिती चार महिन्यांपूर्वी अस्तित्वात आल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी अंदाजपत्रकात नमूद केलेली कामे नगरसेवकांनीच सुचविली आहेत. त्यामुळे या कामांची प्रभागात आवश्यकता असल्यानेच ती सुचवल्याने या कामांच्या निधीचे वर्गीकरण केले जाणार नसल्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी सांगितले होते.
त्यानंतरही गेली चार महिने सतत वर्गीकरणाचे प्रस्ताव स्थायी समितीत दाखल होत असून, या प्रस्तावांचा आकडा १०० पार गेला आहे. परिणामी, गुरुवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत या वर्गीकरणावर समिती काय निर्णय घेणार, याकडे पुणेकरांचे लक्ष असणार आहे.





