PMC Electricity Wastage : लोका सांगे ब्रह्मज्ञान..! पुणे महापालिकेचा अजब कारभार; भर उजेडात वीजेची उधळपट्टी
PMC Electricity Wastage : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार कार्यालयांत वीज बचतीचे नाटक; मात्र सार्वजनिक ठिकाणी सूर्यास्तापूर्वीच दिव्यांचा झगमगाट.

PMC Electricity Wastage – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पालिकेच्या कार्यालयातील वीज वापरावर बंधने आली आहेत. दुसरीकडे सुशोभिकरणाच्या नावाखाली पालिका उड्डाण पुलांखाली केलेल्या आकर्षक विद्युत दिव्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वीजेची उधळपट्टी सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे संध्याकाळी सव्वा सातनंतर अंधार पडण्यास सुरूवात होत असली तरी उड्डाणपुलांचे सुशोभिकरणाचे दिवे मात्र तासभर आधीच म्हणजे सव्वा सहा वाजताच सुरू होतात.
त्यामुळे भर उजेडात वीजेची उधळपट्टी सुरू आहे. एकीकडे कार्यालयात वीज बचत करायची आणि दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी उधळपट्टी करायची असा प्रकार सुरू आहे. महापालिकेने शहरात सुशोभीकरणासाठी उड्डाणपुलाखाली आकर्षक रंगसंगतीचे दिवे बसविले आहेत. हे दिवे प्रत्यक्षात अंधारात सुरू होऊन नागरिकांची वर्दळ असेपर्यंत ते सुरू असावयास हवेत. शहरातील पथदिव्याप्रमाणे हे दिवे सुर्यास्तानंतर सुरू होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात हे दिवे तासभर आधीच सुरू होत आहेत. त्यामुळे उजेड असताना मोठ्या प्रमाणात वीज वापरली जात आहे.
प्रशासनाचे दूर्लक्ष
अनेक उड्डाणपुलांच्या खालील बाजूस सुशोभिकरणाचे दिवे बसविले आहेत. मात्र, प्रत्येकाच्या वेळा वेगवेगळया आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात वीजेचा खर्च होत आहे. प्र्त्यक्षात अशा ठिकाणी सुर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळांनुसार हे दिवे चालू आणि बंद करण्यासाठी आवश्यक यंत्रणा असते. तसेच हे दिवे बसविण्यात आल्यानंतर त्याच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी पुढील काही वर्षे संबधित ठेकेदाराकडेच दिलेली असते. त्यामुळे वेळांनुसार हे काम होते की नाही हे पाहणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात शहरात कुठेही त्यावर महापालिकेकडून लक्ष दिले जात नसल्याने हे प्रकार होत असल्याचे आढळते.





