Pune News : श्री मयुरेश्वर-मोरगावकर सांस्कृतिक मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ हा कार्यक्रम मांजरी येथील अजिंक्यतारा रिसॉर्ट येथे अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा रंगला. कार्यक्रमाची सुरुवात प्रस्तावनेने होऊन कौटुंबिक परिचय, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव तसेच उच्चपदावर नियुक्त मोरगावकरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी रोहिणी संदीप कदम (ढोले) उच्चशिक्षित नवनिर्वाचित सदस्या जिल्हा परिषद पुणे, तसेच डॉ. प्रवीण रामचंद्र गायकवाड (अधिष्ठाता, ESIC आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, पुणे) यांचा सत्कारमूर्ती म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ. दत्ता कोइंकर (ज्येष्ठ व्याख्याते व माईंड पॉवर ट्रेनर) यांनी आपल्या प्रभावी व मार्गदर्शक व्याख्यानातून सकारात्मक विचार, व्यक्तिमत्त्व विकास व जीवनातील यशासाठी आवश्यक मानसिक ताकदीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या सर्व मोरगावकर बांधवांना या कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये शासकीय, निमशासकीय, खाजगी, आयटी, शैक्षणिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील उच्च पदस्थ मोरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब तावरे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी पोलिस महासंचालक सुरेश खोपडे तसेच पुणे मनपा उपायुक्त संदीप शंकरराव कदम (ढोले) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन संतोष महादेव तावरे, अविनाश ढोले, महादेव आबा ढोले, दीपक ढोले आणि विजय कदम यांनी केले. यावेळी उपस्थित मोरगावकर बांधवांना कार्यक्रमाची आठवण म्हणून ‘श्री मोरया’ची प्रतिमा असलेले कॉफी मग स्नेहभेट म्हणून देण्यात आले. ही स्नेहभेट संतोष तावरे व पुणे मनपा उपायुक्त संदीप शंकरराव कदम (ढोले) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. श्री मयुरेश्वर-मोरगावकर सांस्कृतिक मंडळाची स्थापना २०१६ साली झाली असून हे स्नेहसंमेलनाचे दहावे वर्ष आहे. मंडळ स्थापनेचा उद्देश म्हणजे नोकरी, उद्योगधंदा व शिक्षणानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या मोरगावकर बांधवांचा परस्पर परिचय व्हावा, एकमेकांना आधार मिळावा, अडचणीच्या काळात मदत व्हावी तसेच सण-समारंभ एकत्र साजरे करत आनंद उपभोगता यावा हा आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मोरगावकर बांधव उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे स्नेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.