PMC Election : “प्रभाग २१ चा आदर्श प्रभाग म्हणून विकास करणार”; राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा निर्धार

पुणे : ‘प्रभाग क्रमांक २१’ हा शहरातील एक आदर्श प्रभाग म्हणून विकसित करून दाखविण्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांना दिला. प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना उमेदवारांनी प्रभागातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी प्रभाग क्रमांक २१ (मुकुंदनगर – सॅलिसबरी पार्क) येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुगत (श्रीशैल) चंद्रशेखर दसाडे, शोभा संतोष नांगरे, श्वेता संग्राम होनर-कामठे आणि बाळासाहेब अटल उपस्थित होते.
या प्रभागात व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर असून, त्यांच्या व्यवसायवाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, नियोजनबद्ध विकास, तसेच पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही देण्यात आली.
वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक शौचालये, तसेच सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्नांना प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना राबविल्या जातील, असेही उमेदवारांनी सांगितले.
तसेच, स्थानिक नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन राबविण्याचा आमचा मानस असल्याचं देखील सांगितलं.
या सोबतच प्रभागातील लहान व्यावसायिक, फेरीवाले, दुकानदार आणि सेवा क्षेत्रातील घटक यांना सक्षम करण्यासाठी विशेष योजना आखल्या जातील, असे आश्वासन उमेदवारांनी दिले.





