PMC Election: भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब; आज जागावाटपासाठी महत्त्वाची बैठक

प्रभात वृत्तसेवा
पुणे : पुणे महापालिका निवडणूकीसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता दोन्ही पक्षातील जागा वाटप तसेच निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी उद्या ( गुरूवारी) पुण्यात शहर पदाधिकाऱ्यांची बैठक दुपारी आपटे रस्त्यावरील एका हाॅटेलमध्ये होणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली.
दोन्ही पक्षांचे शहर पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार असून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यातच, पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असून राष्ट्रवादी काॅग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतर्फे चर्चेला सुरूवात करण्यात येणार आहे. भाजपने महापालिकेसाठी १२० जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. किमान १४० जागा रिपाईसह लढण्याचे त्यांचे नियोजन असून शिवसेनाला २५ जागा देणार असल्याची चर्चा आहे. त्याच वेळी शिवसेनेकडून ३० ते ३५ जागा पक्षाला अनुकूल असल्याचे शिवसेनेच्या सर्वेक्षणातून समोर आले असून शहर शिवसेनेकडून ही यादी पक्षाच्या राज्यातील नेत्यांकडे देण्यात आली आहे.
त्यामुळे शिवसेनाही त्याच जागांच्या आसपास मागणी करणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची स्थिती तसेच , प्राथमिक जागा वाटपाची चर्चा या बैठकीत होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पुण्यात महायुतीच्या चर्चेला सुरूवात झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू होण्यापूर्वीच हा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे.





