PMC Election: आपला प्रभाग विकासाचे रोल माॅडेल असेल; हर्षवर्धन मानकर यांचा मतदारांना शब्द

प्रभात वृत्तसेवा
पुणे – रामबाग काॅलनी-शिवतीर्थनगर प्रभागातील वस्ती- सोसायट्यांसह परिसरातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात करण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती देत, आपला प्रभाग पुणे शहरातील विकासाचे रोल माॅडेल असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती नीलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे यांच्या प्रचाराची सांगता त्रिमूर्ती मित्रमंडळ आणि जयभवानीनगर परिसरातील सभेने झाली. या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.
सभेपूर्वी आयोजित पदयात्रेत ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण करत उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. मागील दहा दिवसात हर्षवर्धन मानकर, तृप्ती शिंदे आणि कांता खिलारे यांनी गृहभेटी आणि कोपरा सभाद्वारे केलेला प्रचाराने राष्ट्रवादी काँग्रेस घराघरात पोहोचली.
सभेला संबोधित करताना दीपक मानकर म्हणाले, शहराला पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख प्रशासन देण्यासाठी नागरिकांनी परिवर्तनाला साथ द्यावी. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच उमेदवार कटिबद्ध असून, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना ते नेहमी प्राधान्य देतील. काम करणारे, नेहमी तुमच्यासाठी धावून येणारे हर्षवर्धन मानकर, तृप्ती शिंदे, कांता खिलारे यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहनही मानकर यांनी केले.



