PMC Election: उमेदवारांनो, इकडे-तिकडे फेऱ्या मारू नका! कोणत्या परवान्यासाठी कोणाकडे जायचे? वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना विविध परवाने व परवानग्यांची आवश्यकता लागते. याबाबत इच्छुकांकडून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने विचारणा होत आहे. मात्र, निवडणुकीसंबंधी सर्वच परवाने महापालिकेकडून दिले जात नाहीत. पोलिस व राज्य सरकारच्या इतर विभागांकडेही विविध कामांसाठी परवाने व परवानग्या देण्याची जबाबदारी आहे.त्यामुळे संबंधित विभागांकडूनच परवाने प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून इच्छुक उमेदवारांकडून महापालिकेकडे विविध परवाने व परवानग्यांची मागणी केली जात आहे. ठराविक परवाने व परवानग्या वगळता इतर परवाने इच्छुकांना राज्य सरकारच्या संबंधित विभागांकडून घ्यावे लागणार आहेत.त्यानुसार, इच्छुकांनी परवाने व परवानग्यांसाठी थेट संबंधित विभागांकडे अर्ज करावेत, असे आवाहन महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी केले आहे.
विभागनिहाय परवाने व परवानग्यांची जबाबदारी
महापालिका किंवा क्षेत्रीय कार्यालये सभेच्या ठिकाणी पोस्टर्स व झेंडे लावणे, खासगी जागेवरील जाहिरात फलक (कटआऊट वगळता)
प्रचार वाहन परवानगी – निवडणूक निर्णय अधिकारी
– उमेदवारांचे तात्पुरते प्रचार कार्यालय – निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस विभाग
– चौक सभा, सर्व प्रकारच्या जाहीर सभा, ध्वनिवर्धक परवानगी, मिरवणूक, रोड शो – पोलिस विभाग
– हेलिपॅड किंवा हेलिकॉप्टर उतरविणे – संचालक, नागरी विमान सेवा
– प्रसारमाध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन – प्रसारमाध्यम संनियंत्रण समिती





