PMC Election: भाजपमध्ये ‘आयात’ विरुद्ध ‘निष्ठावंत’ संघर्ष पेटला; सोशल मीडियावर कार्यकर्त्यांची मोहीम सुरू

प्रभात वृत्तसेवा
पुणे : कितीही संकटे आली तरी हार न मानणारे, पक्षासाठी समर्पण करणारे निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची खरी ताकद. महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने या निवडणुकीत निवड समितीने निष्ठावंतांना योग्य सन्मान, न्याय आणि स्थान द्यावे, अशी साद भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला घातली आहे.
महापालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने पुण्यात १२० जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.त्यासाठी ऐन निवडणुकांच्या तोंडावर इतर राजकीय पक्षांतील २० ते २५ माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ही नाराजी बंडखोरीच्या रूपात समोर येण्याचीही चिन्हे आहेत.
यादी राज्य समितीकडे?
जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे अडीच हजार इच्छुक आहेत. यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक, इतर पक्षांतील माजी नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते तसेच इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांच्या मुलाखती घेतल्यानंतर पक्षाच्या कोअर कमिटीने प्रत्येक प्रभागातील तीन ते पाच इच्छुकांची नावे राज्य समितीकडे पाठविली आहेत.
राज्य समिती पक्षांतर्गत सर्वेक्षण करून तीन नावे अंतिम करेल. त्यानंतर चर्चा करून एका नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. मात्र, या प्रक्रियेत पक्षाबाहेरील उमेदवारांनाच अधिक संधी मिळण्याची चर्चा आहे. २०१७ च्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश दिले होते. यंदाही तेच चित्र दिसत असून, अनेक वर्षे तयारी करूनही निष्ठावंतांना पुन्हा थांबावे लागणार आहे.
…तरीही अन्याय का?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या संदेशामध्ये भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता सत्ता असो वा नसो, पक्षाशी नेहमी एकनिष्ठ राहतो, असे नमूद केले आहे. ही पोस्ट पदासाठी नाही किंवा विरोधातही नाही. वर्षानुवर्षे तन, मन, धन अर्पण करून पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी ही पोस्ट असल्याचे त्यात म्हटले आहे.
आज पक्षाचे दिवस बदलले, अनेक चेहरे स्वार्थासाठी बदलले तरी काही लोक अजूनही भाजपशी एकनिष्ठ आहेत. महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून, निष्ठावंतांना सन्मान, न्याय आणि स्थान द्यावे. ही मागणी नसून हा आमचा हक्क आहे, असे संदेशात म्हटले आहे.
“निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळावी, हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पक्षाच्या बैठकींमध्ये वरिष्ठांकडे हीच मागणी मांडली आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देणे हीच आमची भूमिका आहे. मात्र, प्रत्येकालाच संधी देणे शक्य नाही.”
– धीरज घाटे, भाजप शहराध्यक्ष





