PMC Anganwadi: अंगणवाड्या भरणार हक्काच्या जागेत! प्रत्येक अंगणवाडीसाठी २० बाय २५ फुटांची जागा देणार
PMC Anganwadi: कोंदट खोल्यांमधून बालकांची होणार सुटका; स्वतंत्र स्वच्छतागृह, स्नानगृह आणि किचनसह सर्व सोयींनी युक्त इमारतींसाठी निधी मंजूर.

PMC Anganwadi – पुणे महापालिका हद्दीतील अंगणवाड्या भाड्याच्या छोट्या खोल्यांऐवजी कायमस्वरूपी आणि सुविधायुक्त इमारतींमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक अंगणवाडीसाठी २० बाय २५ फुटांची पक्की इमारत उभारून त्यामध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह, स्नानगृह आणि स्वयंपाकघराची व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
महापालिका हद्दीत आयसीडीएसअंतर्गत मोठ्या संख्येने अंगणवाड्या सुरू असून, त्यापैकी सुमारे ९० टक्के अंगणवाड्या भाड्याच्या जागेत चालतात. अनेक ठिकाणी केवळ १० बाय १० फुटांच्या खोल्यांमध्ये २५ ते ३० बालके बसविली जातात. त्यामुळे बालकांना पुरेशी जागा मिळत नसून, त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह, हात धुण्याची सुविधा, स्वयंपाकघर आणि खेळण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेच्या ताब्यातील शाळांमधील रिकाम्या खोल्या, सामाजिक सभागृहे, वाचनालये आणि नागरी आरोग्य केंद्रांतील वापरात नसलेल्या जागांचा तात्पुरता वापर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहे. तसेच, आरक्षित भूखंडांवर स्वतंत्र अंगणवाडी इमारती उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
या कामासाठी महिला व बालकल्याण निधी, जिल्हा नियोजन समितीचा निधी, नगरसेवक निधी तसेच सीएसआर निधीचा वापर करण्याचा प्रस्ताव असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले. तर दहा बाय दहाच्या कोंदट खोल्यांमधून अंगणवाड्यांना बाहेर काढून त्यांना हक्काची, प्रशस्त आणि सुविधायुक्त जागा मिळाल्यास बालकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासाला अधिक पोषक वातावरण उपलब्ध होणार आहे.



