PMC Action: शाळेभोवती कचऱ्याचे ढिगारे; महापौरांच्या दणक्याने तासाभरात पालिका ॲक्शनमध्ये!
PMC Action: ‘दैनिक प्रभात’च्या वृत्ताची महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतली दखल; शाळेच्या कंपाउंडलगतचा कचरा हटवला, क्रोनिक स्पॉट बंद करण्याची मोहीम सुरू.

PMC Action: शाळेच्या कंपाउंडलगत साचलेले कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधीचे साम्राज्य आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे ‘दैनिक प्रभात’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. विशेष म्हणजे, ही बाब पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत एका तासात कचरा हटविण्याच्या सूचना दिल्या.
महापौरांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने शिवणे परिसरातील शाळेच्या कंपाउंडलगत साचलेला कचरा तातडीने हटविला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेतल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, केवळ कचरा हटवून न थांबता परिसरातील ‘क्रोनिक स्पॉट’ कायमस्वरूपी बंद करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात येत आहे. आरोग्य निरीक्षक रविराज बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धिविनायक ग्रुपचे असिस्टंट मॅनेजर पवन फडतरे आणि सुपरवायझर अभिषेक कांबळे यांच्या पथकाकडून कोंढवे-धावडे, भीमनगर आणि उत्तमनगर परिसरातील कचरा टाकण्याची ठिकाणे बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.

‘दैनिक प्रभात’च्या वृत्ताची महापौर मंजुषा नागपुरे यांनी घेतली दखल; शाळेच्या कंपाउंडलगतचा कचरा हटवला.
महापौरांचा स्पष्ट आदेश
“विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ही बाब गांभीर्याने घ्या. शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात जो कोणी कचरा टाकत असेल, त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करा,” अशा स्पष्ट सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या. महापौर कार्यालयाकडून तातडीने कारवाई झाल्याने ‘दैनिक प्रभात’च्या वृत्ताची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून आले.
क्रोनिक स्पॉट बंद करण्यासाठी धडक मोहीम
परिसरातील कचऱ्याचे कायमस्वरूपी व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेकडून जनजागृतीसोबतच दंडात्मक कारवाईवरही भर देण्यात येत आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच स्वच्छ संस्थेसोबत कचरा वेचक जोडून घेण्याचे काम सुरू आहे.
“नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. ज्या ठिकाणी कचरा संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे, त्याच ठिकाणी कचरा द्यावा. परिसर कचरामुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कारवाई आणि जनजागृती दोन्ही सुरू आहेत. नागरिक तसेच सोसायट्यांमधील रहिवाशांनी या मोहिमेला सहकार्य करावे.”
– रविराज बेंद्रे, आरोग्य निरीक्षक, पुणे महापालिका
या मोहिमेत स्थानिक नगरसेवक सुभाषभाऊ नाणेकर आणि नगरसेविका अनिताताई इंगळे यांचाही सक्रिय सहभाग आहे. ‘दैनिक प्रभात’ने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौरांनी तातडीने दखल घेतली आणि प्रशासनाला आदेश दिले. त्यामुळे शाळेभोवतीचा कचरा हटला असला तरी आता हा परिसर पुन्हा कचराकुंडी बनू नये, यासाठी प्रशासनासोबत नागरिकांची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.





